शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मला लोकसभेला माढा येथून उभं रहा असा आग्रह सगळ्यांनी केला होता. यासंदर्भात टेंभुर्णीला एक बैठक झाली त्या बैठकीत मला तुम्ही निवडणुकीला उभे रहा अशी विनंती करण्यात आली. संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असं का म्हणायचं? ते घरातलेच आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो आहे असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे.

माढा येथील लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर ही उमेदवारी कोणाला दिली जाणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ही उमेदवारी राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे यांना जाहीर करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचंही शरद पवार यांनी जाहीर केलं.

महाराष्ट्रात या सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. दोन वर्षात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही घेणंदेणं नाही. तो सन्मानानं जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. मी कृषीमंत्री असतानाही आत्महत्या झाल्या मात्र शेतकऱ्यानं आत्महत्या करणं ही चिंताजनक करणं गोष्ट आहे असं मी त्यावेळी मनमोहन सिंग यांना सांगितलं. आम्ही दिल्लीहून नागपूरला आलो त्यानंतर यवतमाळला गेलो. तिथल्या माऊलीला आम्ही विचारलं, का आत्महत्या केली? तिने सांगितलं तो कर्जबाजारी झाला होता. मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवले पण बँकेची नोटीस आल्याने बँकेची नोटीस आल्याने ते पैसे भरण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असं कारण आम्हाला कळलं. त्यामुळे शेतकऱ्याला सन्मानानं जगता आलं तर तो आत्महत्या करणार नाही. आम्ही त्यासाठी आमच्या परिने पूर्ण प्रयत्न केले. मात्र या सरकारला काहीही घेणंदेणं नाही शेतकऱ्यांशी आणि सामान्य जनतेशीही नाही अशीही टीका शरद पवार यांनी केली.