सर्व सेवा संघाची न्यायिक आयोगाद्वारे चौकशीची मागणी

वर्धा : जन्मठेपेची शिक्षा झालेले गुजरातचे पोलीस अधिकारी संजीव भट यांना नाहक फसवल्याची भावना व्यक्त करीत सर्व सेवा संघाने न्यायिक आयोगाद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नोंदवली आहे. देशभरातील गांधीवादी संस्थांची शिखर संस्था असलेल्या सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सेवाग्राम येथे पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी नेहमीच कायदा व सुव्यवस्था राखण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले होते. १९९०च्या सोमनाथ यात्रेवेळी त्यांनी कायद्याची बुज राखण्यासाठी काही नेत्यांची नाराजीही ओढवली होती. पुढे २००२च्या गुजरात दंगलीवेळी त्यांनी कायद्याचे राज्य काय असते, हे दाखवून देताना सत्ताधाऱ्यांचा रोष ओढवून घेतला. अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना हेतूपुरस्सर गोवण्यात आले. त्यांचा पद्धतशीर काटा काढण्यात आला. त्यांना न्याय मिळावा, अशी आमची भूमिका आहे. आम्ही भट यांच्यासोबत आहोत, अशी भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच न्यायिक आयोग स्थापन करण्याच्या मागणीबाबत ठराव करण्यात आला.

विदर्भ भूदान यज्ञ मंडळ निर्मितीस आव्हान

राज्य शासनाद्वारे स्थापन विदर्भ भूदान यज्ञ मंडळाच्या निर्मितीस न्यायालयात आव्हान देण्याचे कार्यकारिणीने ठरवले. सर्व सेवा संघाच्या मते, मध्यप्रदेश भूदान यज्ञ अधिनियम १९५३च्या अनुसार अशा मंडळावर सर्व सेवा संघास सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र शासनाने मात्र बेकायदेशीर संस्थेने सुचवलेल्या व्यक्तींसह या मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या इतिहासात हा असा पहिलाच प्रकार घडल्याने त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचे ठरवण्यात आले आहे. भूदान आंदोलनाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची १२५ वी जयंती ११ सप्टेंबर २०१९ला आहे. या पर्वावर ११ सप्टेंबरला राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. महात्मा गांधी व कस्तुरबा यांची १५०वी जयंती २ ऑक्टोबर २०२० पर्यंत विविध उपक्रमांसह साजरी करण्याचा निर्णय सर्व सेवा संघाच्या कार्यकारिणीने घेतल्याचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी सांगितले.