कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन सोहळ्याचे वेळी श्री पांडुरंग पादुकांना आळंदी येथील माऊलींच्या मंदिरात प्रवेश द्यावा अशी मागणी ह.भ.प.विठ्ठल महाराज वासकर यांनी केली आहे.
पंढरपूर येथील वासकर वाड्यात ह.भ.प.विठ्ठल महाराज वासकर यांनी पत्रकार परिषद घेवून श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी या श्री पांडुरंग पादुका कार्तिक वारी पालखी सोहळ्याची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी ह.भ.प.नामदेव वासकर, वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष माऊली जळगावकर, एकनाथ महाराज वासकर, गोपाळ महाराज देशमुख यांच्यासह वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
ह.भ.प.वासकर म्हणाले, श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे वेळी सर्व सत्ताधिश त्रैलोक्य स्वामी श्री पांडुरंग परमात्मा हे पुंडलिक राय व संतांच्या मांदियाळीसह श्री क्षेत्र आळंदी येथे संजीवन समाधी सोहळ्यास उपस्थित होते. या संजीवन समाधी सोहळ्यासाठी त्यांनी सर्व तिर्थांना व देवांना हजर राहण्याची आज्ञा केली. श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधी स्थळाची निश्‍चीती त्यांनी केली व स्वहस्ते माऊलींना त्यांनी समाधी दिली.
या संत नामदेवांच्या अभंगाप्रमाणे माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला श्री पांडुरंग उपस्थित होते हे सर्वज्ञात आहे. हीच परंपरा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सन २०१४ पासून सुरू करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे तत्कालीन अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी या कार्तिक वारीच्या पालखी सोहळ्यात श्री पांडुरंगाच्या पादुका या वासकर दिंडी समवेत आळंदीला पाठविण्यास सुरूवात केली. या पादुका आळंदीत आल्यानंतर त्या संजीवन समाधी सोहळ्याचे वेळी श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीने मंदिरात घेणे आवश्यक असताना त्यांनी त्या घेतल्या नाहीत. याबाबत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती व वासकर फडाच्या वतीने आळंदी संस्थानला पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून संजीवन समाधीच्यावेळी अगोदर दहा मिनिटे व पुष्पांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर पाच मिनिटे अशी केवळ १५ मिनिटे पादुका समाधीजवळ ठेवाव्यात अशी मागणी केली होती. परंतू आळंदी देवस्थान समितीने त्यास नकार दिला आहे ही बाब वारकरी सांप्रदायाच्या दृष्टीने लांच्छनास्पद आहे. एकीकडे आपण संतांच्या अभंगावर किर्तन, प्रवचनाद्वारे लोकप्रबोधन करण्याचे काम करतो. त्याच संतांच्या सोहळ्याच्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंगालाच जर मंदिर प्रवेश मिळत नसेल तर त्या संतांचे पाईक होण्याचा आपल्याला काय अधिकार? असा प्रश्‍न उपस्थित करून आळंदी देवस्थान समितीने याबाबत पुर्नविचार करावा व पांडुरंगाच्या पादुका या संजीवन समाधी सोहळ्याच्यावेळी माऊलींच्या मंदिरात घ्याव्यात अशी मागणी वासकर यांनी केली आहे.
याबाबत श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अजित कुलकर्णी यांच्याकडे चौकशी केली असता ते म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून पांडुरंगाच्या पादुका आळंदीस येतात. कार्तिक वद्य सप्तमीला या पादुकांचे आगमन होते. त्याच दिवशी मंदिर समितीच्यावतीने या पादुकांचा आदरपूर्वक सन्मान केला जातो. पांडुरंग व माऊलींची भेट झाल्यानंतर या पादुका वासकर फडावर राहतात. पूर्व नियोजीत कार्यक्रमामुळे माऊलींचे समाधी मंदिरात पारंपारिक कार्यक्रम, भाविक भक्तांची गर्दी व मंदिर परिसराचा आकार पाहता कार्तिक वद्य त्रयोदशीस श्री पांडुरंग रायाच्या पादुका समाधी मंदिरात आणणे शक्य होणार नाही. गेल्या दोन वर्षापासून जी परंपरा आहे तीच पुढे कायम राहील.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी हा कार्तिक वारीचा पालखी सोहळा सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवीत आहे. तो सोमवार दि.२१ नोव्हेंबर रोजी आळंदी येथे पोहोचणार आहे. रविवार दि.२७ नोव्हेंबर रोजी माऊलींचा संजीवन समाधी सोहळा होणार आहे.

What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
Departure of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony on 29th June
पुणे : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव