महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याच्या निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सम्राज्याचा इतिहासाचा ज्या किल्ल्यांशी संबंध आहे, अशा कोणत्याही किल्ल्याला हात लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही शिवाजी महाराजांच्या इतिहासात प्रामुख्याने उल्लेख असणाऱ्या सज्जनगड, अजिंक्यतारा, जंजीरा, पन्हाळदुर्ग या किल्ल्यांचे काय होणार याबद्दल अद्यापही गूढ कायम आहे. शिवाजी महाराजांसंदर्भातील ऐतिहासिक पार्शवभूमी असलेले हे पाचही किल्ले असंरक्षित किल्ल्यांपैकी असल्याने या किल्ल्यांबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

अजिंक्यतारा, जंजीरा, पन्हाळदुर्ग या किल्ल्यांचा मराठा सम्राज्याच्या इतिहासाशी थेट संबंध आहे. मात्र हे किल्ले असंरक्षित किल्ल्यांच्या यादीमध्ये आहेत. राज्य शासनाने शिवाजी महाराज आणि मराठा सम्राज्याशी संबंधित किल्ल्यांना हात लावणार नाही असं सांगितलं आहे.

‘राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. पहिले ‘वर्ग एक’ मधील आणि दुसरे ‘वर्ग दोन’मधील. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे ‘वर्ग एक’मध्ये येतात आणि अन्य सुमारे ३०० किल्ले हे ‘वर्ग दोन’ मध्ये येतात. ‘वर्ग एक’चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत आहेत. शासनाने केवळ वर्ग दोनच्या किल्ल्यांसंदर्भात धोरण आखले आहे,’ अशी माहिती पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी राज्य सरकारची बाजू मांडताना दिली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर शंभर असंरक्षित किल्ल्यांची यादी जारी केली आहे. मात्र एकूण ३०० असंरक्षित किल्ले असताना सरकारच्या धोरणामध्ये असलेले आणि ज्यासंदर्भात सरकार धोरण तयार करत आहेत ते उर्वरित २०० किल्ले कोणते असा सवाल उपस्थित केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला मराठा सम्राज्याची राजधानी घोषित केले होते. या राजधानीला बळकट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले. यामध्ये मानगड, पन्हाळदुर्ग, सोनगड, चांभारगड आणि लिंगाणा या किल्ल्यांचा समावेश आहे. पन्हाळदुर्ग आकाराने अगदीच लहान असून तो रायगडाकडे येणाऱ्या मार्गांवर टेहाळणी करण्यासाठी वापरला जायचा. शिवाजी महाराजांनी बांधलेले मानगड, पन्हाळदुर्ग, सोनगड, चांभारगड, लिंगाणा हे किल्ले असंरक्षित किल्ल्यांच्या यादीमध्ये आहेत.

लहान किल्ल्यांबरोबरच या असंरक्षित किल्ल्यांच्या यादीमध्ये ऐतिहासिक दृष्ट्या अशा काही महत्वाच्या किल्ल्यांचाही समावेश आहे. साताऱ्यातील सज्जनगड हा समर्थ रामदास स्वामींचे निवसास्थान म्हणून ओळखला जातो. लाखो लोक रामदास स्वामींचे भक्त असून सज्जनगडाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे. मग अशा गडांसंदर्भात सरकार नवीन धोरणांची अंमलबाजवणी करताना कोणते नियम लावणार? या किल्ल्यांचा विकास केल्यास भक्तांची आणि अनुयायांची प्रतिक्रिया काय असेल? यासारखे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.

साताऱ्यामधील अजिंक्यतारा हा किल्ला मराठा सम्राज्याची चौथी राजधानी होती. राजगड, रायगड आणि जिंजीनंतर अजिंक्यतारा किल्ल्यामधून मराठा सम्राज्याचा कारभार चालायचा. अंजिक्यतारा किल्ला हा शिलाहारकालीन राजा भोज दुसरा याने ११९० मध्ये बांधला. स्वराज्यांमध्ये अधिक अधिक किल्ले समावून घेताना महाराजांनी अजिंक्यतारा किल्ला २७ जुलै १६७३ मध्ये ताब्यात घेतला. आजारी असल्याचे महाराज या किल्ल्यावर दोन महिने वास्तव्यास असल्याचे संदर्भ सापडतात.

कल्याणच्या दक्षिणेकडील टेकडीवर मलंगगड आहे. हिंदू आणि मुसलीम धर्मीय लोक मोठ्या संख्येने या गडावर प्रार्थनेसाठी येतात. हा गडही असंरक्षित गडांच्या यादीत आहे. या अशा अनेक गडांबद्दल सरकार कोणते नियम लावणार आणि त्यासंदर्भातील सरकारचे धोरण कायबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

याच गोंधळावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. ‘जर मराठा साम्राज्याची राजधानी अजिंक्यतारा आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेला सज्जनगड असंरक्षित किल्ले असतील तर फडणवीसांच्या
राज्यात ‘संरक्षित’ आहे तरी कोण?,’ असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यासंदर्भात एमटीडीसीने २५ किल्ल्यांची यादी तयार केली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच यामुळे पर्यटन वाढवण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.