देशाला संतांच्या विचारांची गरज आहे. संतांचा विचारच देशाला तरून नेईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन जगविख्यात सचखंड गुरूद्वारा परिसरातील श्री गुरूग्रंथ साहिब भवनात शनिवारी सुरू झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार होते. परंतु ते येऊ न शकल्याने बडोले यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. घुमान येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संत तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर व हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. हभप प्रा. शिवाजीराव मोहिते संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
सदानंद मोरे यांनी, घुमान संमेलनाध्यक्षपदाचा माझ्या रूपाने प्रथमच एका साहित्यिक वारकऱ्याला मान मिळाला. १८९८ पासून अनेक संमेलने झाली. परंतु वारकरी पंथातील कोणीही माणूस संमेलनाचा अध्यक्ष झाला नव्हता. वारकरी पंथातील मीच पहिला अध्यक्ष होणार आहे, असे सांगितले. मंत्री लोणीकर यांनी, संत गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा आदर्श समोर ठेवला. शुद्ध पाण्याच्या शोधासाठी मोठय़ा प्रमाणात माणसांचे बळी जात आहेत. ५६ लाख कुटुंबे आजही लोटा घेऊन रस्त्यावर बसतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झाले पाहिजे, असे सांगितले. तुमच्या आशीर्वादानेच आम्ही सत्तेत आहोत, असे सांगून वारकऱ्यांना उद्धट बोलणाऱ्यांना सरकार कदापि माफ करणार नाही, असा इशारा दिला.
डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी संत वाङ्मयाचा आढावा घेतला. नांदेड शहराला आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशी मोठी परंपरा लाभली आहे. संत साहित्य हा मराठी संस्कृतीला लाभलेला अमूल्य वारसा आहे. मध्ययुगीन मराठी साहित्याची संतवाणी समृद्ध आहे. संतांनी निर्माण केलेली भाषा, कानाकोपऱ्यातल्या सामान्यजनाची आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात (वै.) मारूतीमहाराज दस्तापूकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांची पत्नी चांगुनाबाई यांना एक लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देण्यात आले. उपस्थित मान्यवरांचाही स्मृतिचिन्ह, घोंगडी, तुळस भेट देऊन आगळा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अधून-मधून टाळ, मृदंग यांच्या वादनाबरोबर ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करण्यात आला. उपस्थितांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील वारकरी होते. बहुतेकांनी पांढरेशुभ्र धोतर, कुर्ता व डोक्यावर पांढरी टोपी घातली होती. कपाळी भगवे गंधही लावले होते. आयोजक विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. सकाळी िदडी निघाली. पहिल्या सत्रात संतविचार व आंतरभारती यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सोमवारी (दि. ९) संमेलनाचा समारोप होईल. या वेळी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार भालचंद्र मुणगेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.