इंदापूरचा दोन दिवसांचा मुक्काम आटोपून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सकाळी पूजा-अर्चा उरकून पुणे जिल्ह्य़ातील शेवटच्या मुक्कामी सराटीकडे प्रस्थान ठेवले. रविवारी, १४ जुलै रोजी पालखी सोहळा पुणे जिल्ह्य़ाची हद्द ओलांडून सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करणार आहे. गतवर्षी महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यासाठी नीरा नदीत पाणी नसल्याने टँकरने पाणी आणून पादुकांना नीरा नदीच्या पात्रात स्नान घालण्यात आले होते.
या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने या वर्षी पालखी सोहळ्याने नीरा नदी ओलांडण्यापूर्वी नीरा नदीत पाणी सोडण्याची दक्षता घेतली असून सध्या नीरा नदीत पाणी असल्याने पादुकांना नीरा स्नान नीरा नदीत होणार आहे. सकाळी नीरा स्नान आटोपून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करील.
दरम्यान इंदापूरकरांचा पालखी सोहळ्याने आज भावपूर्ण निरोप घेऊन प्रस्थान ठेवले. पालखी सोहळ्यासोबत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, त्यांच्या पत्नी भाग्यश्री, कर्मयोगी शंकररावजी पाटील, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंदापूरच्या नगराध्यक्षा सौ. माया मुकुंद विंचू, उपनगराध्यक्ष भरत शहा, स्वीय सहायक बाळासाहेब देशमुख आदींसह इंदापूर तालुका जिजाऊ महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यां व इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थ असे सुमारे पाचशे जण पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळ्याने पहिली विश्रांती गोकुळीचा ओढा येथे घेतली. इंदापूर ते बावडा या २५ किलोमीटरच्या टप्प्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी विश्रांती दरम्यान वारक ऱ्यांसोबत भाजी-भाकरीचाही आस्वाद घेतला.
शुक्रवारी दिवसभर तालुक्याच्या परिसरात पाऊस होता. मात्र आज दिवसभर पावसाने उघडीप दिली. वाटेवरील सुखद गारवा अंगावर झेलत, भागवत धर्माच्या झेंडय़ाची लयबद्ध फडफड, टाळ मृदुंगांचा ब्रह्मानंदी नाद आणि ज्ञानोबा-तुकारामाचा अखंड जयघोष करीत दुपारी पालखी सोहळा वडापुरी, सुखड असा टप्पा पार करून बावडा या हर्षवर्धन पाटील यांच्या गावी दुपारच्या विश्रांतीसाठी पोहोचला. या वेळी मयूरसिंह पाटील, उदयसिंह पाटील, विकास पाटील आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तद्नंतर पालखी पालखीस्थळांवर भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली. दुपार व चौथी विश्रांतीही बावडा येथेच घेतली. या वेळी परिसरातील भाविकांनी रांगा लावून पादुकांचे दर्शन घेतले.