मुरुडजवळील फणसाड धरणात पोहताना बुडालेल्या मुंबईतील तरुणाचा  मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणाचा मृतदेह बुधवारी पाचव्या दिवशी शोधून काढण्यात भारतीय तटरक्षक दलाच्या पानबुडय़ांना यश आले. सत्यप्रकाश कुडतरकर असे या मृत तरुणाचे नाव असून तो सांताक्रूझ येथील आग्रीपाडा परिसरात राहात होता. मागील शनिवारी आपल्या मित्रांसमवेत तो फणसाड परिसरात वर्षांविहारासाठी आला होता. तेथील धरणात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
अखेर बुधवारी भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकातील पाणबुडय़ांनी सकाळपासूनच सत्यप्रकाशला शोधण्याची मोहीम हाती घेतली. दुपारी त्याचा मृतदेह हाती लागला. या दरम्यान सत्यप्रकाशचे मित्र तसेच नातेवाईकही तेथे पोहोचले होते. भारतीय तटरक्षक दलाच्या मुरुड- जंजिरा विभागाचे जीवरक्षक जी. सिंह आणि एस. सिंह- अधिकारी तसेच सूरज प्रकाश उतम अधिकारी, जे. पी. मिना- उतम नाविक, कुलदीप-उतम नाविक यांच्या पथकाला बारशीव येथील नीलेश घाटवळ तसेच काजूवाडी, बारशीव येथील ग्रामस्थ, बोर्लीचे पोलीस उपनिरीक्षक थवई यांनी सहकार्य केले.