लाचखोरीच्या प्रकरणात एका महिला सरपंचासह अन्य तिघांना अटक करण्यात आल्याची घटना रायगड जिल्ह्य़ातील सुधागड पाली तालुक्यात घडली आहे. बिअर शॉपीसाठी ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला देण्यासाठी वाघोशी महिला सरपंच यांनी तीन सहकाऱ्यांकडून लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. तक्रारदार यांनी वाघोशी ग्रामपंचायतीकडे बिअर शॉपी काढण्यासाठी ना-हकरत दाखला देण्यासाठी अर्ज केला होता. ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये बिअर शॉपीला ना-हरकत दाखला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. ग्रामसभेत ठराव मंजूर झालेल्या ठरावावर सरपंचाची सही घेऊन येण्याची विनंती ग्रामसेवकांनी तक्रारदार यांना केली होती. मात्र सरपंचाच्या पतीसह अन्य दोघांनी या प्रकरणात २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. महिला सरपंचांनी आपल्या सहकाऱ्यांना भेटा त्यांनी सांगितले की सही देईन नाही तर सही देणार नाही असे सांगितले होते.
याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ मार्चला पडताळणी केली. या वेळी झालेल्या तडजोडीनंतर २५ हजारांच्या बदल्यात १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. यानंतर सोमवारी २८ मार्चला सकाळी साडेअकराच्या सुमारास सापळा रचण्यात आला आणि सरपंच यांचे पती शंकर गोऱ्या वाघमारे यांना कुभारघर आदिवासी वाडी येथून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. यानंतर महिला संरपच बायू शंकर वाघमारे आणि त्यांचे साथीदार अशोक रंगनाथ रुईकर आणि अश्विनी अशोक रुईकर यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक अर्डेकर, सहा. फौजदार भोईर, पोलीस हवालदार पाटील, खंडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याचे रायगडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सुनील कलगुटकर यांनी दिली. या प्रकरणी सुधागड पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.