घरातील दारिद्रय़ाचे भांडवल न करता खेळावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या सरुताईला अजूनही आपल्याला फुटबॉल खेळता येईल, अशी आशा आहे. याच आशेवर ती आजही ज्ञानदीप शाळेच्या मैदानावर फुटबॉलचा सराव करते. जेमतेम आíथक परिस्थितीतही इतरांकडून मिळालेल्या साहित्याच्या मदतीने सरुताईने या खेळात प्रावीण्य मिळवले. गरिबीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला दोष न देता त्यावर मात करून आपल्या खेळातील यशाचा आलेख चढता ठेवल्यानेच सरुताईला अजूनही आपल्याला मदतीचा हात मिळेल अशी आशा आहे.
मोलमजुरीतून वडिलांना मिळणारे अत्यल्प उत्पन्न आणि आजारी आई यामुळे सरुताईवरच संपूर्ण घराची जबाबदारी असते. घरचा स्वयंपाक आणि इतर जबाबदाऱ्या उत्तमपणे सांभाळून सरुताईचा मैदानावरचा सराव सुरू असतो. फुटबॉलवर असलेल्या प्रेमामुळेच ती आजवर येथे पोहोचली असल्याची जाणीव तिला आहे. सरुताईमधील गुणकौशल्य आणि तिच्या शैलीदार खेळीला प्रशिक्षक शामसुंदर भालेराव यांनी खरा आकार दिला. त्यामुळेच ती राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करू शकली. मात्र, आता मोठय़ा वर्गात गेलेल्या सरुताईला खेळाची संधी मिळणार नाही यामुळे प्रशिक्षक भालेराव चिंतीत आहेत.
‘सरुताई प्रचंड मेहनती, जिद्दी आणि होतकरू फुटबॉलपटू आहे. तिला या पातळीवर प्रोत्साहन आणि योग्य संधी मिळाली तर तिचा खेळ आणखी फुलू शकतो. एखाद्या खासगी क्लबची मदत मिळाली, खेळायची संधी मिळाली तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. मराठवाडय़ात महाविद्यालयीन पातळीवर मुलींचा फुटबॉल विकसितच झालेला नसल्याने एकही संघ इथे नाही. त्यामुळे स्पर्धात्मक खेळातून सरुताईला बाहेर पडावे लागते आहे.’, अशी खंत ते व्यक्त करतात.

मराठवाडा विद्यापीठात संघच नाही..
सरुताईने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी औरंगाबादनजीकच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. परंतु सरुताईचे दुर्दैव असे की, औरंगाबादमधील कोणत्याही महाविद्यालयातर्फे मुलींचा फुटबॉल संघ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत उतरवला जात नाही, किंबहुना मराठवाडा विद्यापीठ स्तरावरच मुलींचा फुटबॉल संघ नाही. बारावीपर्यंत फुटबॉल खेळणाऱ्या मराठवाडय़ातील मुलींना नाइलाजाने पुढे खेळ सोडून द्यावा लागतो किंवा दुसऱ्या एखाद्या खेळाकडे वळावे लागते. सरुताईबरोबर महाराष्ट्राच्या संघात इतर दोन मुली मराठवाडय़ातील होत्या. त्यांनीही हाच पर्याय स्वीकारला आहे, हे विशेष.
विद्यापीठांअतर्गत असलेल्या महाविद्यालयांमधूनच मुलींचे फुटबॉल संघ तयार होत नाहीत. मुळात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाच होत नसल्याने विद्यापीठ पातळीवरही मुलींचा संघ नाही.
– डॉ. दयानंद भक्त, क्रीडा संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ.