|| मोहन अटाळकर

गेल्या दोन दशकांमध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या प्रश्नांच्या थेट मुळाशी भिडणाऱ्या संस्थांपैकी यवतमाळची दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ ही एक संस्था. या संस्थेने दीनदयाल शेतकरी विकास प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी संस्थेला सहकार्याची गरज आहे.

दीनदयाल संस्थेने सुरुवातीला व्यापक सर्वेक्षण करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माहिती गोळा केली. ज्या विधवा महिलांवर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे, ज्यांना कुठलाही अन्य आधार नाही, कोणत्याही प्रकारचा शासकीय लाभ मिळाला नाही, अशा महिलांना त्यांच्यातील कौशल्याच्या आधारे व्यवसाय उभारून देण्याचे प्रयत्न संस्थेने सुरू केले. संस्थेने आत्महत्याग्रस्त ४०० कुटुंबांची निवड करून त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. या कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा चंगच संस्थेने बांधला आहे. २३४ कुटुंबांची स्वावलंबनाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. यंदा आणखी शंभर कुटुंबांना मदत करण्याची योजना संस्थेने आखली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य मिळवून देण्याचे काम दीनदयाल संस्थेमार्फत केले जाते. या कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था संस्थेच्या वसतिगृहांमध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना घरी राहून शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते. अशा कुटुंबांना मानसिक, भावनिक आधार मिळावा, यासाठी संस्था दरवर्षी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करते.

शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळच येऊ नये, यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन काम सुरू केले आहे. डॉ. विजय होनकळसकर आणि निखिलेश बागडे हे संशोधक संस्थेला या कामात साहाय्य करीत आहेत. संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार आत्महत्यांमागे अपुरी सिंचन व्यवस्था, खर्चीक शेती, शेतीपूरक व्यवसायांची कमतरता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली होणारी लूट, त्याने वाढवलेले परावलंबित्व आदी प्रमुख कारणे समोर आली. त्यानुसार संस्थेने कमी खर्चाची शेती, जलभूमी विकास प्रकल्प, शेतीपूरक उद्योग या कार्यक्रमांची आखणी केली. यवतमाळजवळील निळोणा येथील कृषी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेला हे कार्य वाढवायचे आहे, असे संस्थेचे सचिव विजय कद्रे यांनी सांगितले.

संस्थेने पारधी समुदायाच्या विकासासाठी १९९७ पासून कार्य सुरू केले. पारधी बेडय़ावर आरोग्याबाबत जागृती व्हावी, या हेतूने ‘केशव आरोग्य रक्षक योजना’ सुरू करण्यात आली. या वंचित समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी ‘विवेकानंद छात्रावास’ सुरू करण्यात आले. याच वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची बेडय़ांवर आरोग्यरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. या वसतिगृहाची मोठी इमारत आणि सोबतच व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे. आगामी काळात हा प्रकल्प विकासापासून दूर असलेल्या पारधी समुदायाच्या उन्नतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकेल, असे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर म्हणाले.