विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्याचा संकल्प

पुणे : ‘तुम्ही अंध किंवा अपंग असलात म्हणून काय झाले, तुमची शिकण्याची आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची इच्छा आहे ना, मग हिंमत बाळगा. मी तुम्हाला मदत करतो..’ स्वत: अंध असलेले राहुल देशमुख हा विश्वास युवक-युवतींना देतात. त्यांनी आजवर अंध-अपंग मिळून साडेबाराशे युवक-युवतींना यशाचा मार्ग दाखवला आहे. अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केले असले तरी त्यांच्या संस्थेकडे स्वत:ची जागा नसल्यामुळे ते विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुरू करू शकलेले नाहीत. विद्यार्थिनीच्या वसतिगृहासाठी त्यांना दानशूरांचे पाठबळ हवे आहे.

राहुल देशमुख मूळचे नगर जिल्ह्य़ातील एकरुखे या गावचे. उच्चशिक्षित होण्याच्या इच्छेने अकरावीसाठी ते पुण्यात आले; पण अंध असल्यामुळे त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अनेक अडचणी सोसत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नंतर अनेक पदव्याही मिळवल्या. शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जे कष्ट सोसावे लागले तसे इतरांना सोसावे लागू नयेत म्हणून राहुल यांनी स्वत:च अंध, अपंग, गतिमंद, कर्णबधिरांसाठी संस्था स्थापन केली. तेव्हा ते बारावीत शिकत होते. हा अंध आणि बारावीत शिकणारा मुलगा सामाजिक काम कसे करू शकेल, या अनेकांच्या शंकेला त्यांना त्या वेळी सामोरे जावे लागले. एमएस-सीआयटीचे संगणक प्रशिक्षण राहुल देशमुख यांनी अंधांसाठी सुरू केले आणि तेव्हा तशा प्रकारचे शिक्षण कुठेच दिले जात नव्हते. त्यामुळे हे शिक्षण ते कसे देऊ शकतील, असाही प्रश्न विचारला जायचा.

नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (एनएडब्ल्यूपीसी) संस्थेतर्फे अंध, अपंग महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी संगणक प्रशिक्षणापासून संगीत-वाद्यवादनापर्यंत आणि इंग्रजी संभाषणापासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत अनेक प्रकारचे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात.

विद्यार्थी, विद्यार्थिनी मिळून सुमारे दीडशे जण संस्थेत एकाच वेळी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असतात.

संस्थेतर्फे युवकांसाठी वसतिगृहही चालवले जाते. २५ युवक त्याचा लाभ घेतात; पण संस्थेची स्वत:ची जागा नसल्यामुळे युवतींसाठी ही सुविधा गरज असूनही संस्था देऊ शकत नाही. युवतींच्या निवासाची व्यवस्था झाली तर अनेक अभ्यासक्रम, उपक्रम सुरू करता येणार आहेत. मात्र ही योजना पुढे सरकू शकलेली नाही.

राहुल यांची डोळस पत्नी देवता अंदुरे देशमुख याही उच्चशिक्षित असून त्या राहुल यांच्या बरोबरीने पूर्णवेळ संस्थेचे काम करतात.

संस्थेला कोणतेही अनुदान नसल्याने आणि सर्व उपक्रम, अभ्यासक्रम विनामूल्य चालवले जात असल्यामुळे अनेक गोष्टी आणि योजना या दोघांच्या मनात असल्या तरी निधी उभारणी हे मोठे आव्हान असतेच.

तरीही अतिशय नेटाने गेली २० वर्षे राहुल देशमुख हे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत. या कामाच्या पाठीशी समाज उभा राहतोच, तसाच तो पुढेही उभा राहील आणि आमचे काम आम्ही अधिक जोमाने करू, या भावनेतून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे.