सेवेत कायम केले जात नसल्याच्या मुद्यावरून संतप्त झालेल्या बलदेवसिंग गंगाराम पाल या रखवालदाराने गुरुवारी सकाळी सटाणा येथील आबासाहेब सोनवणे महाविद्यालयात कुऱ्हाडीने दिसेल त्याच्यावर हल्ला चढविल्याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात प्राचार्याना वाचवू पाहणारे प्रयोगशाळा परिचर दादाजी एम. मगरे (रा. सोमपूर, ता. सटाणा) हे ठार झाले तर प्राचार्य दिलीप शिंदे (रा. सटाणा), प्रा. प्रफुल्ल गंगाधर ठाकरे (रा. कुपखेडा, ता. सटाणा) आणि सुनील नारायण सागर (रा. वाडी, ता. देवळा) हे जखमी झाले. ठाकरे आणि सागर यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मूळचा नेपाळचा असलेला पाल सहा वर्षांपासून रखवालदार म्हणून महाविद्यालयात कार्यरत आहे. सेवेत कायम करावे असा त्याचा प्रयत्न होता. पण प्राचार्य दाद देत नसल्याने तो अस्वस्थ होता. संस्थेने सेवेत कायम करण्याचा निर्णय घेऊनही प्राचार्य तो देत नसल्याचा त्याचा समज झाला. या संतापातून तो कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पडला आणि दिसेल, त्यांच्यावर हल्ला करू लागला. त्यात प्रा. ठाकरे आणि सागर गंभीर जखमी झाले. मग बलदेवने आपला मोर्चा प्राचार्याकडे वळविला. त्याला रोखण्यासाठी सरसावलेले मगरे यांच्यावर त्याने वार केले. मग, तो प्राचार्य शिंदे यांच्या पाठीमागे लागला. त्यांच्यावरही त्याने हल्ला केला, परंतु, शिंदे यांनी वार चुकविल्याने ते थोडक्यात बचावले. धावून आलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी बलदेवला पोलिसांच्या ताब्यात दिले.