News Flash

सातारा : पोलीस ठाण्यातच तक्रारदार, आरोपीत हाणामारी; एकाची धारदार शस्त्राने हत्या

पोलीस अधीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

संग्रहित छायाचित्र

मुलीला शिवीगाळ केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. अदखलपात्र तक्रारीच्या चौकशी कामी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलेले असताना तक्रारदार व आरोप असणाऱ्या व्यक्तींमध्ये वादवादीतून केलेल्या एकमेकांवरील हल्ल्यात एकाचा खून झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

सुरेश प्रल्हाद कांबळे (वय ४४, रा. सैदापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, रामा दुबळे (रा. मतकर कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. या मारामारीत रामा दुबळेही जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामा दुबळे याची सासुरवाडी सैदापूरमध्ये आहे. त्याच वस्तीत सुरेश कांबळे त्याच्या कुटुंबासह राहत होता. रामा दुबळे याच्या ओळखीच्या मुलीचा सुरेश कांबळे यांच्या मुलीशी वाद झाला होता. तीन दिवसापूर्वी याबाबत सुरेशच्या मुलीने तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

दाखल तक्रारीमध्ये आज दोघांनाही तालुका पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सुरेश कांबळे हा आधीच तालुका पोलीस ठाण्यात आला होता. त्याने सोबत पिशवीमध्ये कोयता आणला असल्याची कोणाला माहिती नव्हती. थोड्या वेळाने रामा दुबळेही पोलिस ठाण्यात आला. तो पोलिस ठाण्यात आल्या-आल्याच सुरेश कांबळे याने रामा दुबळेवर पोलिसांसमोरच कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. या झटापटीत दोघेही पोलीस ठाण्याच्या बाहेर आले. यावेळी सुरेश कांबळेच्या हातातून कोयता निसटून खाली पडला. तीच संधी साधत रामा दुबळेने तो कोयता उचलला आणि सुरेश कांबळेच्या डोक्‍यात, हातावर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात सगळीकडे रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता.

पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, सुरेश कांबळेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर रामा दुबळेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्यात झालेल्या या प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी तातडीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व अधिकाऱ्यांना तपासाबाबतच सुचनाही दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 8:55 pm

Web Title: satara complainant at police station assault on accused one killed with a sharp weapon aau 85
Next Stories
1 सोलापुरात कोसळल्या धर्माच्या भिंती; कुलकर्णी काकूंवर मुस्लिम समुदायाने केले अंत्यसंस्कार
2 महाबळेश्वर, पाचगणीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू
3 महाराष्ट्रात २९३३ नवे करोना रुग्ण, १२३ मृत्यू
Just Now!
X