News Flash

कासच्या पठारावर यंदा फुले रुसली!

ऑगस्टमध्ये या पठारावर नित्य उमलणारी आणि दिसणारी अनेक फुले अद्याप उमलली नाहीत.

फुले रुसलेले कासचे यंदाचे पठार.

अतिवृष्टीचा परिणाम, हंगामास विलंबाची शक्यता

विश्वास पवार, वाई

दरवर्षी पाऊस सुरू झाला, की ऑगस्टच्या मध्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी उमलून येणारे कासचे पठार यंदा रुसले आहे. सध्या हे पठार केवळ हिरव्या झुडपांमध्ये सुस्त आहे. ऑगस्टमध्ये या पठारावर नित्य उमलणारी आणि दिसणारी अनेक फुले अद्याप उमलली नाहीत. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे  हे घडल्याचे अभ्यासक आणि वनाधिकाऱ्यांचे मत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात या महिन्यात जोरदार पाऊस झाला. पावसाचा सर्वाधिक जोर हा सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांत होता. यातही ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात पावसाचा जोर मोठा आणि सातत्यपूर्ण असा होता. या अतिवृष्टीचा फटका यंदा कास पठाराला बसला आहे.

कास पठारावरील आजवरच्या सरासरीपेक्षा कैकपटीने हा अधिकचा पाऊ स कोसळला आहे. या अतिवृष्टीमुळे कास परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. या साऱ्यामुळे पठारावर ऑगस्टपासूनच उमलणाऱ्या अनेक प्रजाती यंदा उमलल्याच नाहीत.

बहरासाठी निसर्गाची साथ हवी

सध्या केवळ तीन ते चार जातींचीच तुरळक फुले उमलली आहेत. संपूर्ण पठारावरील बहर येण्यास निसर्गाची साथ आवश्यक आहे. पाऊस थांबला आणि हवामान चांगले राहिले तर सप्टेंबरमध्ये फुले दिसण्याची शक्यता आहे.

– रंजन परदेशी, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, मेढा

अतिवृष्टीचा परिणाम

अतिवृष्टी, उन्हाचा अभाव, उघडीप न मिळणे या अशा कारणांमुळे यंदा प्रथमच कासच्या पठारावर फुलांचे प्रमाण खूप कमी दिसत आहे. जी फुले उमलली आहेत, तीदेखील अतिशय तुरळक आणि अल्पसंख्येने आहेत. गेल्या आठवडय़ापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून ते तसेच राहून ऊन पडल्यास सप्टेंबरमध्ये या पठारावर काही प्रमाणात फुले पाहण्यास मिळतील.

– डॉ. संदीप श्रोत्री, कास पठारावरील फुलांचे अभ्यासक

झाले काय?

दरवर्षी साधारण ऑगस्टपासून पठारावर सर्वत्र गेंद, सीतेची आसवं, कापरू, पंद, तेरडा, हिरवी निसुरडी इत्यादी फुले उमलू लागतात. परंतु यंदा अतिवृष्टीमुळे यातल्या अनेक फुलांचे दर्शन अजून घडलेले नाही. जी दिसतात तीदेखील अत्यंत तुरळक प्रमाणात आहेत. खरे तर एरवी या काळात पठारावर सीतेची आसवं किंवा गेंदच्या फुलांचे गालिचे पसरलेले असायचे. परंतु अतिवृष्टीमुळे कासचे नेहमीचे हे असे मनोहारी दर्शन यंदा घडण्याची शक्यता कमी आहे. आता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यापुढे हवामानाची स्थिती अनुकूल राहिली तरच सप्टेंबरमध्ये पठारावर फुले दिसण्याची शक्यता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 2:23 am

Web Title: satara kaas plateau no flower this year in kaas plateau zws 70
Next Stories
1 नंदुरबारमध्ये घराणेशाहीलाच बळ !
2 लातूरमध्ये ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचे चित्र!
3 पूर ओसरल्यानंतर जमीन खचण्याचे प्रकार
Just Now!
X