एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री बदलणे म्हणजे पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखे नाही, अशा शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना प्रतित्तुर दिले. महाडिक यांचे पेट्रोल पंप असल्याने त्याचा संदर्भ पाटील यांनी घेतला.
माजी खासदार महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निष्क्रीय आणि अपयशी कारभारामुळे जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा निष्क्रिय पालकमंत्र्याना बदलून धडाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवावे, अशी मागणी केली होती.

मंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. मंत्री पाटील म्हणाले, ‘ माझ्यावर निष्क्रियतेचा टीका करताना धनंजय महाडिक यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पावणे तीन लाख मतांनी पराभव झाला होता हे पाहावे. यावरुन ते किती सक्रिय होते हे स्पष्ट होते.त्यामुळेच नागरिकांना त्यांना निष्क्रिय ठरविले,असा टोला त्यांनी लगावला.

भाजपने माजी खासदार महाडिक यांचे प्रदेश उपाध्यक्ष पद काढून कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली. शिवाय त्यांच्याकडे राज्यातील साखर कारखाना उद्योगाची संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. हा संदर्भ नमुद करून सतेज पाटील यांनी ‘महाडिकांच्या स्वत:च्या कारखान्यावर २०० कोटीहून अधिक कर्जाचा डोंगर आहे.स्वत:चा कारखाना सक्षमपणे चालविता येत नाही. तीन हंगाम कारखाना चालवता आला नाही. अशांना भाजपने साखर तज्ज्ञ म्हणून समितीवर घेणे हे हास्यास्पद आहे. ते कारखाने आणि कारखानदारीशी निगडीत प्रश्न काय मांडणार ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.