सोलापूर शहर व परिसरासह जिल्हय़ाच्या बहुतांश भागात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत असून, आणखी पाऊस पडावा म्हणून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
जिल्हय़ात यंदा मृग नक्षत्र जवळपास कोरडाच गेल्यामुळे खरीप हंगामात पिकांच्या पेरण्यांना विलंब झाला आहे. मृग नक्षत्रापाठोपाठ आद्र्रा नक्षत्रातही पावसाने पाठ फिरविल्यामुळे सारेच जण हवालदिल झाले आहेत. शेतक-यांना पिकांच्या पेरण्यांची चिंता सतावत असताना दुसरीकडे शहरी भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चिंता सतावत आहे. या पाश्र्वभूमीवर अखेर वरुणराजाने कृपा केली आणि पावसाने सायंकाळी हजेरी लावली. मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले.