मुसळधार पावसाचे हवामान खात्याचे भाकीत पावसाने खोटे ठरविले आहे. मात्र गेल्या दहा दिवसांत जिल्ह्य़ात समाधानकारक पावसाची नोंद झाली असून, सरासरी २१६.१७ मि. मी. एवढा पाऊस कोसळला आहे. शनिवारी दिवसभराचा सरासरी ३१.६० मि. मी. पाऊस नोंदला गेला आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता, पण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस कोसळला नाही. मात्र शेतीसाठी सध्यातरी कोसळणारा पाऊस समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सकाळी ८ वा. सरासरी ३१.६० मि. मी. म्हणजेच २५२.८० मि. मी. एवढा पाऊस कोसळला. १ जून पाऊस आज सकाळपर्यंत सरासरी २१६.१७ मि. मी. म्हणजेच १७२९.४० मि. मी. एवढय़ा पावसाची जिल्हा आपत्ती यंत्रणा कक्षात नोंद झालेली आहे. जिल्ह्य़ात आठही तालुक्यात सकाळी ८ वाजता नोंदला गेलेला, तसेच गेल्या दहा दिवसाचा एकूण पाऊस कंसात मि.मी.मध्ये नोंदला गेला आहे. तो पुढीलप्रमाणे- दोडाममार्ग १० (२०४), सावंतवाडी २० (२११), वेंगुर्ले ३२ (१९३), कुडाळ ५१ (२८१), मालवण ७१ (३९२), कणकवली ११ (१८९), देवगड ३९ (१४५), वैभववाडी १८ (११४) मिळून आज कोसळला २५२.८० मि. मी. तर दहा दिवसांत कोसळलेला १७२९.४० मि. मी. एवढा पाऊस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आठही तालुक्यात पाऊस पोहोचला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांची गडबड सुरू झाली आहे, तसेच अनेक ठिकाणी अधूनमधून पावसाचे आगमन होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांची चिंता दूर केली असून, पाणीटंचाईदेखील भासणार नाही, असे यंत्रणेचे म्हणणे आहे