विदर्भातील तीन जिल्हे वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस

पुणे : मराठवाडय़ाने यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसात आघाडी घेतली असताना सर्वाधिक पावसाच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही विभागांत जुलैमध्ये पावसाने चिंताजनक ओढ दिली होती. मात्र, ऑगस्टमध्ये सुरुवातीपासून दमदार पाऊस झाल्याने सध्या विदर्भातील तीन जिल्हे वगळता राज्यात सर्वच ठिकाणी समाधानकारक पावसाची नोंद झाली.

परिणामी जुलैमध्ये निर्माण झालेला पर्जन्य आणि पाणीसाठय़ाचा अनुशेषही ऑगस्टमध्ये भरून निघाला. जुलै महिन्यामध्ये मराठवाडा वगळता राज्यातील बहुतांश भागात पावसाने दीर्घ ओढ दिली होती. गतवर्षी याच महिन्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच राज्यातील बहुतांश धरणे भरली होती. जुलैच्या शेवटच्या टप्प्यात धरणांतून मोठा विसर्ग होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. यंदा जुलैमध्ये संपूर्ण राज्यातील पाऊस सरासरीच्या तुलनेत काहीसा मागे पडला होता. त्यामुळे पाणीसाठे आणि शेतीबाबतही चिंता व्यक्त केली जात होती. सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील ठाण्यासह पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, विदर्भातील अमरावती, गडचिरोली, चंद्रपूरसह सात जिल्ह्य़ांत अल्प पावसाची नोंद झाली होती.

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसात मागे पडलेले विदर्भातील तीन जिल्हे वगळता इतरत्र जुलैमधील पावसाची कमतरता भरून निघाली.

पावसाची शक्यता कायम

गुरुवारी (२० ऑगस्ट) कोकण विभागात मुंबई, रत्नागिरीसह तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही हलका पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर कायम होता. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २४ ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार, तर ठाणे, मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटक्षेत्रांमध्येही या काळात काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज विभागाने दिला आहे.

पाणीसाठय़ातही वाढ : पावसाचा पहिला टप्पा संपत असताना जुलैच्या अखेरीस कमी पावसामुळे कोकण आणि पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत खूपच मागे पडला होता. मात्र, आता त्यात समाधानकारक वाढ झाली आहे. कोकणातील सर्व प्रकल्पांत जुलै अखेरीस ५३ टक्के पाणीसाठा होता, तो २० ऑगस्टला ७२ टक्क्य़ांवर आला. पुणे विभागातील ३१ टक्के पाणीसाठाही आता ७२ टक्क्य़ांवर आला आहे. औरंगाबादमध्ये गतवर्षी ३०.७७ टक्के असलेला पाणीसाठा सध्या ५३.९४ टक्के आहे. अमरावती आणि नागपूर विभागात गतवर्षी अनुक्रमे २८.७१, ४०.७६ टक्के असलेला पाणीसाठी सध्या ६२.२७ आणि ६५.०१ टक्क्य़ांवर आहे.

सरासरीहून अधिक..

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये हंगामातील पाऊस आता सरासरीच्या पुढे गेला आहे. विदर्भातील गोंदिया, अमरावती आणि अकोला या तीनच जिल्ह्य़ांत सध्या पाऊस सर्वात कमी आहे. एकूण राज्याचा सरासरी पाऊस १७ टक्क्य़ांनी अधिक आहे.