नीरज राऊत/ निखील मेस्त्री

धूपप्रतिबंधक बंधा:याला भगदाड, नौकानयन मार्गात गाळ

पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी गावाला गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. गावाच्या किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधारा असला तरी पावसाळय़ात समुद्राला उधाण आल्यावर या बंधा:याला पडलेल्या भगदाडातून पाणी गावात शिरते आणि अनेक घरांचे नुकसान होते. त्याशिवाय नौकानयन मार्गामध्ये गाळ असून गावात पाण्याची समस्याही बिकट आहे.

30 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 350 मासेमारी बोटी असून मासेमारी उद्योगावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अवलंबून असलेली अनेक कुटुंबे सातपाटीमध्ये वास्तव्य करत आहेत. सातपाटी गावामध्ये दर पावसाळ्यात उधाणाच्या वेळी गावातील खोलगट भागात समुद्रातल्या पाण्याचे अतिक्रमण होते. त्यामुळे शेकडो घरांमध्ये पाणी शिरून त्यांचे नुकसान होते. किना:यावर असलेल्या धूपप्रतिबंधक बंधा:यामध्ये पडलेली भगदाडे बुजवून बंधा:यांची उंची वाढवावी ही गावाची प्रमुख मागणी आहे.

सातपाटीच्या बंदरामध्ये नौकानयन मार्गामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचला असून यामुळे बोटीच्या ये-जा करण्यावर मर्यादा येतात. हा गाळ काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित असून या दृष्टीने ठोस कामगिरी झालेली नाही. गावातील घाऊक मासे विक्रीसाठी आणि किरकोळ विक्रीसाठी बाजारपेठ असावी, गावात असलेल्या मत्स्यउद्योग शाळेमध्ये उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ गावक:यांना मिळावा, गावातील मूलभूत सुविधांचा स्तर उंचावण्यात यावा, त्याचप्रमाणे गावात असलेल्या तुफान पाडय़ाला अधिकृत दर्जा मिळावा अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

सातपाटी गावाचा विकास व्हावा आणि या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी सातपाटी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे .

समस्या काय?

* सातपाटीच्या पश्चिमेस फेब्रुवारी 2002मध्ये 1,550 मीटर लांबीचा धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. मात्र गेल्या 17 वर्षात या बंधा:याची देखभाल-दुरुस्त न केल्याने अनेक ठिकाणी त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटांचा तडाखा घरांना बसत आहे.

* सातपाटी खाडीमध्ये असलेल्या नौकानयन मार्गामध्ये नऊ  लाख घनमीटर गाळ साचला आहे. सप्तमी ते दशमी या काळादरम्यान खाडीपात्रंमध्ये पाण्याची पातळी कमी असते. यामुळे या काळादरम्यान नौकानयन मार्ग उथळ असल्याने अनेकदा मासेमारी बोटीला बंदराबाहेर थांबून उभे राहावे  लागते. गाळ काढण्यासाठी 2क् कोटींचा निधी मंजूर झाला तरी तांत्रिक कारणामुळे काम प्रलंबित आहे.

* सातपाटी हे पश्चिम किनारपट्टीवरील मोठे मासेमारी बंदर आहे. त्यामुळे मासळीच्या विक्रीसाठी येथे घाऊक बाजारपेठ बनवण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या कामाला अजून आरंभ झाला नसून परिणामी रस्त्याकडेला बसून माशांची विक्री करावी लागत आहे.

* सागरी किनारा व्यवस्थापन आराखडय़ांमध्ये मुंबईसह पालघर किनारपट्टीवरील कोळीवाडे हे मच्छीमारांच्या नावावर करावी ही मागणी प्रलंबित आहे. मात्र मच्छीमारांच्या वैयक्तिक नावे जागा नसल्याने त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येत नाही.

* 26 गाव पाणीपुरवठा योजनेतून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यात आली. सातपाटी येथे टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे, सध्या पिण्याचे पाणी दर तीन ते चार दिवसांनी येते. एकत्रित नळ पाणी योजनेतील पाणी कमी येत असल्याने पाण्याची समस्या भेडसावते.

* सातपाटी येथे जिल्हा परिषदेने सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. मात्र  त्या ठिकाणी मनुष्यबळ कमतरता असल्यामुळे या आरोग्य केंद्राचा कोणताही लाभ येथील रहिवाशांना होत नाही.