पालघर : पालघर आणि २६ गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट सातपाटी गावाला गेले २० दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. जलवाहिनीला गळती लागल्याने तसेच जलवाहिनीच्या झडपांमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे.

या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच पालघर नगर परिषदेचे पदाधिकारी यांची भेट घेऊन समस्या मांडली. या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराकडून गळती व तांत्रिक दोष दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले असून येत्या काही दिवसांत सातपाटीला पाणीपुरवठा पूर्ववत होईल असे सांगण्यात आले. दरम्यान पालघर नगर परिषद ही नळपाणी योजना २०११ पासून चालवीत असून सातपाटीसह अनेक ग्रामपंचायतीने अनेक वर्षांपासून पाणीपट्टीची थकबाकी भरण्यात आलेली नाही. त्यामुळे योजना कार्यरत ठेवण्यात पालघरच्या नागरिकांवर आर्थिक भार पडत आहे. या सर्व जलवाहिनीवर अद्ययावत पद्धतीचे पाणी मीटर बसविण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेच्या सूत्रांनी दिली. सातपाटीतील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे.