जनलोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी आंदोलनासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्यानंतर २३ मार्चपासून प्रत्यक्ष सत्याग्रहाला सुरुवात करणार असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शुक्रवारी अहमदनगर येथे सांगितले.
We will begin our Satyagraha on 23 March on issues of farmers: Anna Hazare pic.twitter.com/5HaIY7iZjz
— ANI (@ANI) March 16, 2018
अण्णा हजारे म्हणाले, आम्ही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, दिल्ली पोलिस आणि महापालिकेला गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून जागा उपलब्ध करुन देण्याबाबत पत्राद्वारे विचारणा केली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सुमारे ४३ पत्रे लिहीली. यामध्ये लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत मागणी केली होती. मात्र, आमच्या कुठल्याही पत्राला अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही. केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याला दुबळा बनवल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे.
अण्णा हजारे यांनी २०११ मध्ये युपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचाराविरोधात मोठे जनआंदोलन उभारले होते. या आंदोलनाचा मोठा परिणाम झाला होता. या आंदोलनाला देशभरातील माध्यमांनी पाठींबा दिला होता. तसेच लोकांनीही मोठा पाठींबा दर्शवला होता.
या आंदोलनामधूनच अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि कुमार विश्वास यांचा राजकीय उदय झाला होता. त्यानंतर या तिघांनी मिळून स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठे राजकीय यश मिळाले. त्यामुळेच सध्या अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आहेत. दरम्यान, यावेळी देखील आण्णा हजारे आपल्या आंदोलनातून तोच परिणाम साधू शकतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 7:57 pm