सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंत दाभोळकर (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी ज्येष्ठांच्या प्रश्नांसाठी संघटना स्थापन करून विविध उपक्रम राबविले. संघटनेचे सुमारे चौदाशे सदस्य बनविले होते. क्रीडा शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर यशवंत दाभोळकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला होता. भारताचे पहिले केंद्रीय पुनर्वसनमंत्री, आझाद हिंद सेनेचे जनरल जगन्नाथराव भोसले यांनी एन.डी.ए.ची स्थापना केल्यावर राजस्थानमध्ये जाऊन शिक्षण घेतले.
राजस्थानमध्ये एनडीएमध्ये शिक्षण घेतल्यावर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या विविध हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम केले; काही काळ ते क्रीडा खात्यातही होते. क्रीडा शिक्षण म्हणून सेवा करताना खोखोसह विविध खेळांना त्यांनी प्राधान्य दिले. क्रीडा शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. या संघाचे चौदाशे सभासद केले. त्यांनी कायमच ज्येष्ठांचे प्रश्न हाताळताना ज्येष्ठांच्या सहलींनाही प्राधान्य दिले होते. सावंतवाडी नगरपालिकेच्या व  शहरवासीयांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तेव्हा नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या यशवंत दाभोळकर यांच्यामुळेच नगरपालिकेने ज्येष्ठ सुविधा केंद्र उभारले. या केंद्राला त्यांचे नाव देण्याबाबत नगरपालिका प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.
 या श्रद्धांजली सभेत माजी आमदार जयानंद मठकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, ज्येष्ठ सभासद अण्णा देसाई, अनंत माधव तसेच मान्यवरांनी विचार मांडताना यशवंत दाभोळकर यांच्या कामाचे कौतुक केले.