सावरकर साहित्य संमेलनात ठरावू

स्वा. सावरकरांना भारतरत्नने सन्मानित करण्यासह स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सावरकरांना नजरकैदेत ठेवण्याची कारणे काय ती सर्वासाठी खुली करावीत यासह एकूण सहा ठराव येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनात करण्यात आले. औरंगाबाद येथील स्वा. सावरकरप्रेमी मित्र मंडळ, ठाणेस्थित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, भगूर नगरपालिका आणि मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्यातर्फे स्वा. सावरकर यांच्या ५० व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधत त्यांच्या मूळ गावी भगूर येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन स्वातंत्र्य लढय़ात योगदान देणाऱ्या विविध क्रांतिकारकांच्या वारसांच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्यनगरीत आदल्या दिवसापासून सावरकरप्रेमींचे येणे सुरू झाले होते. शुक्रवारी सकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे संमेलनाचे ध्वजारोहण झाले. ग्रंथदिंडीत जवळपास पाच हजार विद्याथ्यांनी वंदे मातरम्, जयोस्तुते, ने मजसी ने या गीतांचे सामूदायिक गायन सादर केले. संमेलनाचे अध्यक्ष देशभक्तकोषकार चंद्रकांत शहासने यांनी अध्यक्षीय भाषणात सावरकर यांची सर्व भविष्ये खरी ठरली असल्याचे नमूद केले. पर्यावरण, विज्ञान, अणू तंत्रज्ञान, संरक्षण, सैनिकी शिक्षण, राष्ट्राच्या सीमांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन, आरोग्य, धार्मिक सुसंवाद या सर्व बाबतीत सावरकरांचे विचार काळाच्या कसोटीला उतरले असून राजसत्तेने ते स्वीकारावे अशी आमची अपेक्षा आहे. राष्ट्रहितास्तव जनजागरण व्हावे आणि राष्ट्रभक्तीचा वारसा पुढे चालविण्याच्या उद्देशाने सावरकरांच्या विचारांतून देश महासत्ता बनेल याकडे त्यांनी लक्ष वेधले. संमेलनात ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्यिक योगदान’ आणि ‘हिंदुत्व आणि सावरकरांची विज्ञाननिष्ठा’, ‘सावरकर : एक विचार’ या विषयावर परिसंवाद झाले. सायंकाळच्या सत्रात स्वातंत्र्यवीर सावरकररत्न मानपत्राचे वितरण, विविध ठराव आणि नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. क्रांतिकारकांच्या छायाचित्र व माहितीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. समारोप सत्रात मांडण्यात आलेल्या ठरावात सावरकरांना भारतरत्नने सन्मानित करावे, अंदमान येथील सावरकरांची काढलेली वचने सन्मानपूर्वक पुन्हा लावावीत, नेत्रदान-देहदान यासारख्या योजना सावरकरांच्या नावे सुरू कराव्यात, सावरकरांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम शालेय व शासकीय स्तरावर करावेत, सावरकरांचे विचार, कविता प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन पाठय़पुस्तकांमध्ये मांडावेत, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सावरकरांना नजरकैदेत का ठेवण्यात आले, त्याची कारणे खुली करावीत असे ठराव संमत करण्यात आले.