स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीत २८ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन पुढील आठवडय़ात आयोजित करण्यात आले आहे.  सावरकरांच्या आत्मसमर्पणाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधत स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई) आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे संयुक्तपणे होत असलेल्या या संमेलनाबाबत माहिती देताना वाचनालयाचे अध्यक्ष्य अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाचनालयाच्या सभागृहात २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार असून ३१ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात विविध व्याख्याने, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

संमेलनानिमित्त २९ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे. पतित पावन मंदिरापासून निघणाऱ्या या दिंडीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, तसेच निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार असून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय या संमेलनस्थळी सांगता होणार आहे. सावरकरांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित चित्ररथांचाही त्यामध्ये सहभाग राहणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन आणि संमेलनाध्यक्ष राष्ट्रीय भटक्या व विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू ऊर्फ दादा इदाते यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर ज्येष्ठ गायक रवींद्र साठय़े आणि सहकारी ‘स्वरलहरी’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (३० जानेवारी) ‘सावरकरांच्या कल्पनेतील हिंदूराष्ट्र’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात अ‍ॅडव्होकेट किशोर जावळे व डॉ. श्रीरंग गोडबोले सहभागी होणार आहेत. दुपारी पावणेबारा ते एक या वेळात ‘सावरकरांचे साहित्य विश्व’ या विषयावर धनश्री लेले यांचे व्याख्यान होणार आहे. भोजनानंतर दुपारच्या सत्रात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सावरकरांचे द्रष्टेपण’ या विषयावर परिसंवाद होणार असून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व प्रा. सोनवडकर सहभागी होणार आहेत. सावरकर दर्शन प्रतिष्ठाननिर्मित सावरकरांच्या जीवनाचा संगीतमय प्रवास घडवणाऱ्या ‘अनादि मी-अवध्य मी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने या दिवसाची सांगता होणार आहे.  संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ‘भारतातील सामाजिक क्रांती आणि सावरकरांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होणार असून दुर्गेश परुळकर, समीर दरेकर आणि अश्विनी मयेकर त्यामध्ये भाग घेणार आहेत. प्रा. दत्ता नाईक परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्यानंतर डॉ. अशोक मोडक यांचे ‘सावरकर घराण्याची देशभक्ती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.