जखमी अवस्थेत राजापूर तालुक्यातील माडबन येथील जैतापूरच्या खाडी किनारी शनिवारी आढळलेल्या ब्ल्यू व्हेल प्रजातीच्या माशाला वनविभागाने रविवारी समुद्रामध्ये सोडले.  स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छिमारांच्या साथीने वन विभागाने या माशाला  विशेष मोहिम राबवून जीवनदान दिले.  हा मासा भरतीच्या पाण्यासोबत किनाऱ्यावर आला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला होता. शनिवारी जैतापूर खाडीच्या किनारी सुमारे ४७ फुट लांबीचा महाकाय मासा काही स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या निदर्शनास आला. हा मासा जखमी असल्याची माहिती मश्चिमारांनी वनविभागाला दिली होती. या माशाला पुन्हा समुद्रात ढकलण्यासाठी काही ग्रामस्थांनी प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये ते अयशस्वी ठरले होते.

त्यानंतर रविवारी वनविभागाने विभागीय वनअधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबवून माशाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न केले. तालुक्यातील तुळसुंदे येथील आडीवरेकर बंधुंनी उपलब्ध करून दिलेल्या होडय़ांना राजापूरचे वनविभागाचे वनरक्षक सागर गोसावी, कर्मचारी दिपक म्हादये, विजय म्हादये, निसर्गप्रेमी दिपक चव्हाण आणि तुळसुंदे येथील उगवत आणि मावळतवाडीतील ग्रामस्थांनी त्या माशाला दोरीच्या साहाय्याने बांधले. आणि त्याला होडीच्या साहाय्याने खोल समुद्रामध्ये सोडून देत जीवनदान दिले. व्हेल प्रजातीच्या माशाला पुन्हा समुद्रात सोडण्याची मोहिम यशस्वी करण्यासाठी वनविभागाला डॉ. सुनिल राणे, रमेश खडपे, गजानन डोल्रेकर, हरी आडीवरेकर, मधुकर हरडकर, रविकांत आडीवरेकर, किसन आडीवरेकर, परशुराम डोल्रेकर, माडबनचे पोलिस पाटील शाम गवाणकर, राजन वाडेकर,  स्वप्नील सागवेकर, अशोक आंबेरकर, नित्यानंद हरडकर, निवास शिरगावकर, गजानन आडीवरेकर आदींसह तुळसुंदे येथील उगवत आणि मावळतवाडीतील ग्रामस्थ आदींनी वनविभागाला मदत केली.