उत्तर प्रदेशातून मोलमजुरी करण्यासाठी पुण्यात आलेल्या धर्मनाथकुमार भारती यांच्या घरात बुधवारी रात्री पाणी शिरले. पाण्याचा वेग जोरात होता. अशा परिस्थितीत भारती यांनी दोरीच्या साहाय्याने पत्नी आणि लहान मुले तसेच बहिणीला घरातून बाहेर काढले. मुसळधार पावसात पाण्याचा लोट आला आणि काही कळायच्या आत भारती वाहून गेले. कोंढवा भागातील आंबेडकर वसाहतीत ही घटना घडली. या भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आंबेडकरनगर परिसरात पाणी शिरले. भारती बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने पोलिसांना ही माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. भारती यांनी कुटुंबाला वाचविले पण कर्ता पुरुष गेल्याने बहिणीला अश्रू अनावर झाले.

खेड शिवापूरच्या दुर्घटनेची आठवण

पुणे-सातारा रस्त्यावर काही वर्षांपूर्वी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. डोंगरावर पाण्याचा लोट वाहून आला. पाण्याच्या लोटात या भागातून जाणाऱ्या मोटारी वाहून गेल्या. या दुर्घटनेत मोटारीतील महिला आणि तिची आठ महिन्यांची मुलगी वाहून गेली होती. डोंगरावरून आलेल्या पाण्याला वाट करून देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ही दुर्घटना घडली होती. या भागात डोंगरावर एका संस्थेने अनधिकृत बांधकाम केले होते. या बांधकामामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. अचानक पाण्याचा लोट आला आणि रस्त्याने जाणाऱ्या मोटारी बुडाल्या. त्या वेळी पाण्यात मोटारी अक्षरश: तरंगत होत्या.