मंगळवेढय़ातील हृदयद्रावक सत्यकथेने अनेक सरकारी योजनांवरही प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रापासून देशपातळीवर ‘मुलगी वाचवा, मुलीला शिकवा’ या घोषणांचे वारे वाहात आहेत. ‘सुकन्या’पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’पर्यंत अनेकानेक योजना कागदोपत्रीही नांदत आहेत, पण प्रत्यक्षात ‘वाचलेल्या’ मुलींना जीवनसंघर्षांपासून स्वत:ला वाचवणे किती दुर्धर आणि वेदनादायक असते याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यतील मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावातील पाच मुली आणि त्यांची आजी सध्या घेत आहे. केवळ दोन मुली असतील तरच लाभ देण्याचा वायदा सरकार करत असल्याने एका घरात जन्मलेल्या या पाच मुलींना ना सरकारी योजनेचे कवच आहे ना त्या ‘मतदार’ असल्याने कोणत्या राजकीय पक्षाचा आधार आहे!

बोराळे गाव सुमारे १८०० घरांचे. याच गावात बाजीराव दामोदर वाघमारे हा शेतमजूर पत्नी राणीसह राहात होता. या दोघांना एकापाठोपाठ एक अशा पाच मुलीच झाल्या. मंजुळा, संजीवनी, मुक्ता, मीरा आणि मंगल ही त्यांची नावे. पण मुलगा नाही, वंशाला दिवा नाही म्हणून बाजीराव पत्नीवर संतापायचा. कधी मारझोडही करायचा.  सर्वात मोठी मंजुळा १३ वर्षांची, तर सर्वात धाकटी मंगल ही पाच वर्षांची आहे. या चिमुकल्या मुली जन्मापासून बापाकडून आईच्या पदरी पडणारा संताप आणि मारहाण पाहात आल्या आणि या सगळ्याला आपला जन्मच कारणीभूत आहे, हेसुद्धा अजाण वयापासून जाणू लागल्या. एके दिवशी या संतापाचा कडेलोट होऊन बाजीरावने कोयत्याने पत्नीवर वार घातले. त्यात तिचा अंत झाला आणि खुनावरून जन्मठेप झाल्याने बाजीराव तुरुंगात गेला. आईही नाही आणि बापही नाही, या अवस्थेतल्या या मुलींना आजी-आजोबांनी आपल्या घरी नेले.

आईचा मृत्यू डोळ्यांपुढून सरत नसतानाच आजी-आजोबांच्या छायेत जगण्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न या पाच मुली करीत होत्या. कुठूनही आशेचा किरण नाही की कोणाच्या मदतीचा आधार नाही, यामुळे आजोबा दामोदर वाघमारे यांची मनस्थिती मात्र ढासळत गेली. या वयात शेतमजुरी करून पाच मुलींचा सांभाळ आणि पालनपोषण करणं त्यांना कठीण होऊ लागलं. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. आता या पाच मुलींचा सांभाळ म्हातारी आजी जनाबाई शेतमजुरी करून करीत आहे. कुटुंबावर कोसळलेली आपत्ती, वृद्धत्व आणि गरिबी या साऱ्यातून या मुलींचे पालनपोषण कसे करायचे हा जनाबाईंपुढे प्रश्न आहे. १३ वर्षांच्या मंजुळेलाही जणू अकालीच प्रौढत्व आले असून आजी शेतावर गेली की आपल्या बहिणींचा सांभाळ ती करीत आहे. आई आणि आजोबांच्या मृत्यूच्या सावलीत या पाच मुलींचा जीवनसंघर्ष सुरूच आहे.

मुलींच्या प्रगतीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. पण या सर्व योजना केवळ एक किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबालाच लागू आहेत. दुसऱ्या वेळी जर जुळ्या  मुली झाल्या तरच अपवाद म्हणून तीन मुलींना लाभ दिला जातो. पण आपला जन्म झाला, याला त्या पाच मुलींनी काय करावे? यात त्यांचा दोष काय? तीन किंवा त्यापेक्षा जास्त मुली ज्या घरात जन्मल्या त्यांनी काय करावे? त्यांना शिक्षणाचा, प्रगतीचा, जगण्याचा अधिकार नाही? हा प्रश्न यंत्रणेच्याही खिजगणतीत नाही.