11 November 2019

News Flash

पुणे विद्यापीठाचा एक्झिट पोल : राज्यात कोणाला किती जागा?

विशेष म्हणजे या एक्झिट पोलसाठी मतदारांशी बोलणं, एखादा फॉर्म भरुण घेणं अशी कोणतीही प्रक्रिया त्यांनी केली नाही, इतकंच काय तर...

(विनय तिवारी, आर. विश्वनाथ आणि शरद कोळसे, छायाचित्र सौजन्य - पुणे मिरर )

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत देशभरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध एक्झिट पोलद्वारे यंदा कोणाचं सरकार येणार याचे अंदाज बांधले जात आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच आता अजून एक नवा एक्झिट पोल समोर आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी “रॅंडम फॉरेस्ट मॉडेल” ही पद्धत वापरून एक्झिट पोल केला आहे.

कोणी केलाय एक्झिट पोल –
पुणे विद्यापीठातील विनय तिवारी, आर. विश्वनाथ आणि शरद कोळसे या तीन विद्यार्थ्यांनी असिस्टंट प्रोफेसर डॉ. आकांक्षा काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक्झिट पोल तयार केला आहे. तिघंही संख्याशास्त्र विभागातील एम.एस्सी. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे या एक्झिट पोलसाठी मतदारांशी बोलणं, एखादा फॉर्म भरुण घेणं अशी कोणतीही प्रक्रिया त्यांनी केली नाही, इतकंच काय तर स्वतःच्या डिपार्टमेंटच्या बाहेरही हे विद्यार्थी गेले नाहीत.

कशाच्या आधारावर –
यासाठी आवश्यक माहिती आणि आकडेवारी त्यांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन मिळवली, तर जनमानसाचा कल ओळखण्यासाठी ‘सीएसडीएस–लोकनीती’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या सर्वेक्षण अहवालांमधून माहिती घेण्यात आली आहे. यामध्ये वर्तमान सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया, पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांची लोकप्रियता, मागच्या निवडणुकीतील आपले मत यंदा बदलू इच्छिणारे मतदार यांचा समावेश आहे. रॅंडम फॉरेस्ट मॉडेल वापरण्यापूर्वी त्याच्या आधारावर 2009 आणि 2014 च्या निवडणुकांचे अंदाज पडताळून पाहण्यात आले. हे अंदाज प्रत्यक्ष निकालांशी पडताळून पाहिले असता, ते उमेदवारांच्या विजय/पराभवाबद्दल जवळजवळ 96 टक्के जुळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. ही अचूकता इतर कोणत्याही मॉडेलच्या तुलनेत सर्वाधिक आहे असं एका विद्यार्थ्याने सांगितलं.

कोणाला किती जागा – 

या एक्झिट पोलनुसारही महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळतील. यानुसार भाजपाला 17 ते 23 मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर शिवसेनेला 16 ते 21 जागा मिळतील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला 3 ते 9 जागा आणि काँग्रेसला 1 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीच्या आधारेच हा एक्झिट पोल तयार करण्यात आला. आम्ही वर्तवलेले अंदाज इतर एक्झिट पोलच्या जवळपास आल्याचा खूप आनंद आहे. या अभ्यासाचा इतर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नक्कीच फायदा होईल असं असिस्टंट प्रोफेसर डॉ. आकांक्षा काशीकर यांनी सांगितलं.

First Published on May 22, 2019 10:30 am

Web Title: savitribai phule pune university exit poll statistics students make poll forecast