29 February 2020

News Flash

सहाशे प्राध्यापकांच्या शोधनिबंधांत वाङ्मयचौर्य?

सर्वच विद्यापीठांना कमी-जास्त प्रमाणात आयोगाकडून संशोधनासाठी निधी मिळतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

रसिका मुळ्ये, मुंबई

पगारवाढीच्या पलीकडे जाऊन संशोधनामध्ये रस घ्यावा यासाठी प्राध्यापकांना भरघोस निधी देण्यात येत असला तरी अशा संशोधनाला वाङ्मयचौर्याची कीड लागल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील साधारण ६०० प्राध्यापकांनी शोधनिबंधामध्ये उचलेगिरी केल्याचे उघड झाले आहे. विद्यापीठाने त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत.

प्राध्यापकांनी संशोधनात रस घ्यावा, विद्यापीठांमधून संशोधन व्हावे अशा प्रकारची शिक्षण संस्थांमधील भाषणांची टाळीबाज विधाने तकलादू ठरत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजना, केंद्राच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या योजना आणि विद्यापीठाचा निधी यांतून प्राध्यापकांना संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी लाखो रुपये दिले जातात. ते मिळवण्यासाठी प्राध्यापकांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र सर्वच विद्यापीठांमध्ये निदर्शनास येते. निधीचा योग्य विनियोग होण्याऐवजी संशोधन करताना प्राध्यापक पळवाटा काढून कुणाच्या तरी संशोधन साहित्याची उचलेगिरी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशातील सवरेत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ६०० प्राध्यापकांच्या शोधनिबंधामध्ये वाङ्मयचौर्य आढळले. शोधनिबंधांची तपासणी केली असता त्यातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक मजकुरात साधम्र्य आढळले. हे शोधनिबंध गेल्या तीन वर्षांतील आहेत. पुणे विद्यापीठाच्या या प्रातिनिधिक उदाहरणावरून संशोधनासाठी निधी मिळाला तरी निष्पत्ती काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विद्यापीठाची कारवाई

विद्यापीठाच्या ‘आयक्यूएसी’ विभागाने संशोधनासाठी दिलेला निधी, त्यातून झालेले संशोधन याची झाडाझडती सुरू केली. त्यातूनच शोधनिबंधांमधील वाङ्मयचोर्य उजेडात आले. विद्यापीठाने या प्राध्यापकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. प्राध्यापकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देऊन त्यांना संशोधनासाठी दिलेला निधी परत घेणे आणि त्यांच्यावर बंदी घालणे अशी कारवाई करण्याचे विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर विद्यापीठांमध्येही गैरप्रकार?

सर्वच विद्यापीठांना कमी-जास्त प्रमाणात आयोगाकडून संशोधनासाठी निधी मिळतो. तो प्राध्यापकांना दिलाही जातो. मात्र संशोधनाचा दर्जा काय याची तपासणी फारशी केली जात नाही. पुणे विद्यापीठाने ही तपासणी केल्यानंतर गैरप्रकार उघड झाले. मात्र अन्य अनेक विद्यापीठांमध्ये असे प्रकार सर्रास होतात, असे एका माजी कुलगुरूंनी सांगितले.

प्राध्यापकांच्या शोधनिबंधांची तपासणी करण्यात असता मजकुरात साधम्र्य आढळलेल्या प्राध्यापकांना नोटीसा देण्यात पाठवल्या आहेत. त्यांनी नोटिसांना दिलेल्या उत्तराची छाननी करून कठोर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संशोधनात चांगली वाटचाल करीत आहे. अशा वेळी कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

First Published on November 16, 2018 2:42 am

Web Title: savitribai phule pune university sent notices to 600 professors
Next Stories
1 मनमानी खोदकामामुळे उत्पन्न खड्डय़ांत
2 काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली!
3 पिंपरीत-चिंचवडमध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त
X
Just Now!
X