‘या कुन्देन्दु तुषार हार धवला’ ही सरस्वती वंदना ऐकताना आलेल्या ‘भीमसेनी’ सुरांची प्रचिती.. गायकी अंगाने झालेल्या सनईवादनातून उलगडलेले बनारस घराण्याचे सौंदर्य.. मंत्रमुग्ध करणाऱ्या किराणा घराण्याच्या गायनाची आलेली अनुभूती.. संगीतप्रेमी रसिकांचा अलोट उत्साह.. अशा वातावरणात हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवातील सहा दिवसांच्या स्वरयात्रेला मंगळवारी सुरुवात झाली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित या महोत्सवातील पहिल्या सत्राचा पूर्वार्ध किराणा घराण्याच्या गायिकांच्या गायनाने रंगला. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या पणती मीना फातर्पेकर यांनी ‘खंबावती’ हा तिन्हीसांजेच्या वेळचा राग सादर केला. त्याआधी संजीव शंकर आणि अश्विनी शंकर या बंधूंनी सनई सहवादनातून ‘मुलतानी’ रागाचे सौंदर्य उलगडत रसिकांची मनेजिंकली. त्यांच्या वादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी निर्मिती केलेल्या ‘स्वर नक्षत्र’ या दिनदर्शिकेचे आणि हीरकमहोत्सवी महोत्सवाच्या स्मृती जागविणाऱ्या स्मरणचित्राचे प्रकाशन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि प्रसिद्ध गायक उपेंद्र भट यांच्या हस्ते झाले. सवाई गंधर्व यांच्या नातसून पद्मा देशपांडे यांच्या गायन मैफलीपूर्वी त्यांच्या ‘स्वरपद्म’ या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या हस्ते झाले. यामध्ये २७ रागांमधील ३९ बंदिशींचा समावेश असल्याची माहिती निवेदक आनंद देशमुख यांनी दिली.
किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या ७५व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महोत्सवस्थळी भरविण्यात आलेल्या खाँसाहेबांच्या वेगवेगळय़ा मैफलीची आणि त्यांचे सांगीतिक विचार उलगणाऱ्या पत्रांचा समावेश असलेले प्रदर्शन पाहण्यासाठी संगीतप्रेमींनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे महोत्सवातील विविध दुर्मिळ प्रसंग दूरचित्रवाणीच्या माध्यमातून उलगडणारा ‘वॉक थ्रू’ पाहताना श्रोते स्मरणरंजनात रममाण झाले.
गेल्या वर्षभरात दिवंगत झालेले ज्येष्ठ संवादिनीवादक पं. मनोहर चिमोटे, पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष सुधाकर जोशी, संगीत शिक्षक पं. ना. वा. दिवाण, ज्येष्ठ नृत्यगुरू पार्वतीकुमार, सनईवादक महादेवराव दैठणकर, तबलावादक केशव नावेलकर, संगीतकार भूपेन हजारिका, संगीतकार बाळ पळसुले, नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.