६३व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता; अखेरच्या दिवशी ग्वाल्हेर, पतियाळा, किराणा घराण्याची गायकी

‘घेई छंद मकरंद’ या नाटय़पदानंतर ‘आधी रचिली पंढरी’ या अंभंगाचे भक्तिभावपूर्ण सादरीकरण.. गायकी अंगाचे सारंगीवादन.. स्वरांच्या लडीवाळतेने रंगलेला ‘जोगकंस’ अशा श्रवणानंदाची परमोच्च अनुभूती देणाऱ्या मैफलींनी रविवार सकाळ संस्मरणीय झाली. ग्वाल्हेर, पतियाळा आणि किराणा घराण्याच्या गायकीबरोबरच सतार आणि सरोद जुगलबंदीने एकापेक्षा एक सरस मैफलींची प्रचिती कानसेनांना देत ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली. स्वर, लय आणि तालाच्या मोहमयी जगात सलग चार दिवस वावरलेल्या रसिकांनी पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये भेटण्याचे वचन देत एकमेकांचा निरोप घेतला.
ज्येष्ठ गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र आणि शिष्य शौनक अभिषेकी यांच्या गायनाने सकाळच्या सत्राचा प्रारंभ झाला. दोन बंदिशीतून त्यांनी रंगविलेल्या ‘शिवमत भैरव’ रागगायनाने प्रसन्न वातावरणाची निर्मिती झाली. त्यानंतर देवगंधार आणि जौनपुरी रागातील बंदिश त्यांनी सलगपणे सादर केली. ‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ या पदानंतर ‘आधी रचिली पंढरी मग वैकुंठनगरी’ हा अभंग त्यांनी समरसून गायला. ज्येष्ठ तबलावादक पं. निखिल घोष यांचे चिरंजीव ध्रुव घोष यांच्या गायकी अंगाच्या सारंगीवादनातून ‘मियाँ की तोडी’ रागाचे सौंदर्य उलगडले. ‘जोगिया’ रागातील ‘पिया के मिलन की आस’ ही रचना त्यांनी गायन आणि वादनातून रामदास पळसुले यांच्या तबलावादनाच्या साथीने रंगविली. विदूषी मालिनी राजूरकर यांच्या गायनाने सकाळच्या सत्राची सांगता झाली. त्यांनी ‘चारुकेशी’ रागातील दोन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर ‘गौड सारंग’ रागातील बंदिश आणि भैरवी सादर केली.
हा महोत्सव नावारूपाला आणण्यामध्ये योगदान देणारे डॉ. नानासाहेब देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त महोत्सवाचे सायंकाळचे सत्र त्यांना समर्पित करण्यात आले होते. नानासाहेबांच्या स्नुषा आणि किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांच्या गायनाने या सत्राचा प्रारंभ झाला.
ज्येष्ठ गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या शिष्या आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीतशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती वैशंपायन यांच्या मैफलीनंतर स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांचे गायन झाले. प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांच्या गायनातून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे मर्म उलगडले.
चित्रपट पाश्र्वगायनामुळे लोकप्रिय असलेले सुरेश वाडकर यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल हे यंदाच्या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले. अनेक गाणी रसिकांच्या ओठावर असल्याने वाडकर कोणता राग सादर करणार याविषयी कानसेनांमध्ये उत्सुकता होती. सुरेश वाडकर यांनी आपल्या खास शैलीत गायन सादर करताना पतियाळा घराण्याची वैशिष्टय़े उलगडली.

ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांच्या गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात रविवारी रंग भरला. डॉ. नानासाहेब देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त महोत्सवाचे हे सत्र त्यांना समर्पित करण्यात आले होते.