सावंतवाडी नगर परिषद प्रारूप विकास योजना आराखडा प्रादेशिक नियोजन व नगररचना विभागाने प्रसिद्घ केला आहे. त्यात सावंतवाडी संस्थानचा (शहराचा) चुकीचा इतिहास लिहिला गेला आहे, तसेच आराखडा मराठीत प्रकाशित करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले असून, आरक्षणे टाकण्याच्या चुकीच्या पद्धतीविरोधात शहरातील दिनेश नागवेकर यांनी मुख्य अधिकारी नगर परिषद यांना निवेदन देऊन हरकत नोंदविली आहे.

नगर परिषद प्रारूप विकास आराखडय़ाचा मसुदा मराठीतून द्यावा म्हणून विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक, नागरिक यांनी मागणी करूनही नगररचना विभागाने या मागणीला कचऱ्याची टोपली दाखविली आहे. लोकाना हरकती घेण्यास प्रारूप विकास आराखडा मराठीतून दिल्यास शक्य आहे, असे सर्वाचे म्हणणे आहे.

बांधकाम विषयक ज्ञान असणारे दिनेश बाबू नागवेकर यांनी विकास प्रारूप आराखडय़ातील चुकांवर बोट ठेवले आहे. शासनाचे नामनिर्देशित अधिकारी मा. द. राठोड यांनी दुसरी सुधारित विकास आराखडा सूचना दिली आहे.

सावंतवाडी नगर परिषद आणि सावंतवाडी शहराचा इतिहास हा सावंतवाडी संस्थानपासूनच सुरू होतो. नगररचना विभागाने हा इतिहास चुकीचा लिहिला असल्याने नागवेकर यांनी लक्ष वेधले आहे. सावंतवाडी शहराची पहिली पाणीपुरवठा योजना १८९३ मध्ये केसरीहून शहरात पाणीपुरवठा हे रघुनाथ महाराजांच्या पत्नी ताराबाबा यांच्या प्रयत्नाने साध्य झाले. हे नगर परिषदेच्या हॉलमध्ये दर्शनीभागात सावंतवाडी संस्थानचा इतिहास नमूद आहे.

सावंतवाडी संस्थानचा इतिहास नगररचना विभागाने चुकीचा लिहिताना पाणीपुरवठा योजना १८९३ मध्ये राजे रावबहादूर सखाराम बाहेडेकर यांनी सुरू केली असे चुकीचे आहे. सावंतवाडी संस्थानात बाहेडेकर असे कोणी राजे नव्हते. एवढंच काय देशाला-परदेशातसुद्धा या नावाचे राजे नव्हते. या चुकीकडे नागवेकर यांनी लक्ष वेधले आहे.

सावंतवाडी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यासाठी क्वार्टर्स बांधकामासाठी नगर परिषदेने निविदादेखील काढली आहे. म्हणजेच नगररचना विभागाने त्याला मंजुरी दिली असताना पुन्हा आरक्षण क्र. ३०वर सीओ क्वार्टर्ससाठी आरक्षण टाकणे चुकीचे आहे, याकडे नागवेकर यांनी लक्ष वेधले आहे.

या प्रारूप आराखडय़ात शहरातील १७ वॉर्डाची स्त्री-पुरुष लोकसंख्या दिलेली आहे. १९९१च्या जनगणनेनुसार सावंतवाडी शहराची लोकसंख्या २३,८५१ असून त्यापैकी पुरुष ११,९०३ व स्त्रिया ११,९४८ अशी आहे. महिलांची संख्या जास्त असल्यामुळे दर एक हजार पुरुषामागे ९९६ स्त्रिया हे अवहालात दिलेले प्रमाण चुकीचे वाटते. ते एक हजार पुरुषामागे १००४ स्त्रिया असे हवे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे हे प्रमाण १०३७ असे आहे. महाराष्ट्राचे हे प्रमाण ९२५ असे आहे.

सन १९६१ मध्ये सावंतवाडी शहराची लोकसंख्या १५१२० एवढी होती तर २००१ मध्ये २२९०१ एवढी होती. सन २०११ मध्ये २३८५१ एवढी आहे. दहा वर्षांत फक्त ९५० एवढी वाढ झाली. दरवर्षी सरासरी ९५ ने वाढ होत आहे. सन २०१६ मध्ये लोकसंख्या ३० हजार होईल तसेच २०१६ मध्ये ती ३५ हजार होईल असा अंदाज अहवालात आहे, असे नागवेकर यांनी म्हटले आहे. सावंतवाडी संस्थानचे ठाणे नरेंद्र डोंगरावर पूर्वी होते. परंतु आता नरेंद्र डोंगर सावंतवाडी नगरपालिका हद्दीत नाही. वन विभागाकडे असणारा नरेंद्र डोंगर, त्यातील उद्यान यांचा अप्रत्यक्ष लाभ सावंतवाडी शहराच्या नागरिकांनाच होत आहे. सावंतवाडी शहराचे क्षेत्र ६७८ चौ.की.मी. आहे असे म्हटले आहे ते चुकीचे असल्याकडे दिनेश नागवेकर यांनी लक्ष वेधले आहे.

सावंतवाडी शहराचे क्षेत्रफळ ६७८ हेक्टर (सुमारे १६९५ एकर) असून तीन सेक्टरमध्ये विभागले आहे. यातील सेक्टर क्र. १ मध्ये खासकीळ वाडा, भटवाडी, बाहेरचा वाडा वगैरे भाग येतो. त्याचे क्षेत्रफळ ३२४ हेक्टर असून २०११ च्या जनगणनेनुसार यामध्ये ८२६० लोक राहतात. सेक्टर २ मध्ये सालईवाडा, पोलीस लाईन, ज्युस्तीन नगर, सवरेदय नगर वगैरे असा भाग असून, त्याचे क्षेत्र १५८३४ हेक्टर आहे आणि लोकसंख्या ६६८९ आहे. सेक्टर ३ मध्ये बाजारपेठ, उभाबाजार, माठेवाडा, झिरंग वगैरे भाग येत असून क्षेत्र १९५.४५ हेक्टर आहे. त्याची लोकसंख्या ८९०२ एवढी आहे.

या २३,८५१ एवढी लोकसंख्या असलेल्या सावंतवाडी शहरात ३१ मार्च २०१४ च्या आकडेवारीनुसार २६,५६५ एवढी वाहने आहेत, असा उल्लेख अहवालात आहे. या मध्ये एकूण दुचाकी १९,२६८, मोटार कार २०४४, जीप ४१९, रिक्षा १९३३, अ‍ॅम्बुलन्स २२, ट्रक व लॉरी १००६, चारचाकी डिलिव्हरी व्हॅन १०१६१, तीन चाकी डिलिव्हरी व्हॅन ४५७, टॅक्टर ६६ वगैरे अशी आकडेवारी सांगते. सन २०१४ ते २०१६ या दोन वर्षांत आणखी वाढ झालेली असावी म्हणजेच माणसापेक्षा २७१४ वाहने जास्त आहेत. याकडे नागवेकर यांनी लक्ष वेधले आहे.

सन १९९१ मध्ये सावंतवाडी शहराची लोकसंख्या २१,३०५ होती. वीस वर्षांत फक्त २५४६ एवढी वाढ झाली आणि वाहने प्रचंड वाढली असा हा सावंतवाडी शहराचा प्रारूप विकास योजनेचा आराखडा सांगतो.

सन १९८४ अहवालातील आकडेवारीनुसार ट्रक ५४, मोटरसायकल व जीप ४१, मोटरसायकल २३, रिक्षा ४८ अशी एकूण १६६ वाहने इंधनावर चालणारी होती. याशिवाय सायकली ४७०, बैलगाडी ९, हातगाडी ६ या वाहनांची नोंद आहे. पण सन २०१६च्या प्रसिद्ध झालेल्या आराखडय़ात सायकलींची नोंद नाही. परंतु २१ नोव्हेंबर २०१३ च्या मंजूर बांधकाम नियमावलीनुसार कोणत्याही प्रकारची दाट वस्तीत किंवा विरळ वस्तीत कुठेही बांधली तरी पार्किंग सायकलसाठी ठेवणे बंधनकारक आहे. सन २०१६ च्या सुधारित या अहवालातील वाहनाची आकडेवारी शहराची की तालुक्याची असा प्रश्न निर्माण होतो.