जिल्हा परिषद प्रशासनातील बदल्यांच्या प्रयत्नात असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांकडे गर्दी जाणवत असून, येत्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कर्मचाऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून जिल्हा परिषद पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान २११ जागांसाठी ३७९ अर्ज पात्र ठरले असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषद प्रशासनाकडून ६ ते ७ मे रोजी बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. या बदली प्रक्रियेस शिक्षक, ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांत ५ टक्के विनंती बदल्या होणार आहेत तर अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या १० टक्के प्रशासकीय व १० टक्के विनंती बदल्या अपेक्षित आहेत.

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या २११ होणार आहेत. त्यासाठी ४६६ अर्ज आले. त्या अर्जाच्या छाननीनंतर ३७९ अर्ज पात्र ठरले आहेत. जिल्हा परिषद बदल्या प्रक्रिया सुरू झाल्याने काही कर्मचारी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात घिरटय़ा घालताना दिसत आहेत.

बदल्यात आर्थिक फायदा करून घेणारे रॅकेट सर्वत्र कार्यरत असते. शासन निर्णयानुसार अशा रॅकेटला किंमत दिली जात नाही असे प्रशासन प्रमुख सांगतात. पण योग्य निवड व योग्य ठिकाण मिळावे म्हणून कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो.

सिंधुदुर्ग डोंगराळ जिल्हा आहे. त्यामुळे शहराच्या जवळपास बदली व्हावी म्हणून कर्मचारी किंवा शिक्षक नेते प्रयत्नशील असतात. त्या पाश्र्वभूमीवर बदल्यांकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.