सावंतवाडीत आधार कार्ड काढण्याचे टार्गेट एक लाखांचे देण्यात आले आहे, पण त्यासाठी फॉर्म फक्त १० हजार वाटप करण्यात आल्याने आधार कार्डसाठी फेरफटका मारणाऱ्यांना फॉर्मच मिळत नसल्याने या योजनेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या संकुलात आधार कार्ड काढण्यात येत आहे. या कंत्राटदार कंपनीस एक लाख आधार कार्ड काढण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. आधार कार्डसाठी लोकांची गर्दीही होत आहे, पण फॉर्मच नसल्याने सारा गोंधळ होत आहे.
आधार कार्ड टार्गेट लाखाचे असले तरी लोकांना दहा हजार फॉर्म वाटण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात साडेचार हजार लोकांनी फॉर्म भरून दिले आहेत. बाकी साडेपाच हजार फॉर्म प्रतीक्षेत आहेत.
आधार कार्डाची सर्वत्रच सक्ती करण्यात येत असल्याने लोकांनी आधार कार्डसाठी गर्दी केली आहे, पण फॉर्मच उपलब्ध नसल्याने काळ्या बाजाराने प्रत्येक फॉर्म दोन रुपयांना विकला जात असल्याचे बोलले जात आहे. हा फॉर्म झेरॉक्स मशीनवाला विकत आहे, असे सांगण्यात आले. आधार कार्डाचे सावंतवाडीत लाखाचे टार्गेट असताना दहा हजार फॉर्म उपलब्ध करून देऊन बाकीच्या अपेक्षित ९० हजार लोकांचा पैसा फेऱ्या  मारण्यास फुकट घालविण्यात येत असल्याने नाराजी आहे. आधार कार्डाच्या या योजनेला लोकांचा प्रतिसाद आहे, पण कंत्राटदाराचा आधार नसल्याने या हंगामातच लोकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली.