सावंतवाडी नगर परिषदेत सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत बापूसाहेब महाराज आणि श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या तैलचित्राचे अनावरण श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे व नगरसेवक. (छाया- अभिमन्यू लोंढे)

प्रतिनिधी/सावंतवाडी, ४ जुलै

सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज दिलदार राजे होते. संस्थानचे राजे असूनही सावंतवाडी शहरात संस्थान काळात नगर परिषद स्थापन करून लोकल बोर्डाला सर्वाधिकार दिले होते. श्रीमंत बापूसाहेबांनी नगर परिषदेत स्वातंत्र्यपूर्व काळातच लोकशाही आचरणात आणली होती, असे संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी तैलचित्र अनावरण प्रसंगी म्हटले.

सावंतवाडी नगर परिषदेत सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत बाबूसाहेब महाराज आणि श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्या तैलचित्राचे अनावरणप्रसंगी श्रीमंत खेमसावंत भोसले बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याधिकारी विजयकुमार शास्ते उपस्थित होते.

सावंतवाडी संस्थान काळात श्रीमंत बापूसाहेब महाराजांनी नगर परिषदेची स्थापना केली होती. त्या काळात संस्थानच्या राजांनाच सर्वाधिकार होते, पण नगर परिषद स्थापन करून लोकल बोर्डाला सर्वाधिकार दिले. शहराचा विकास करण्याचा अधिकार लोकांनाच दिल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातच सावंतवाडी लोकशाहीची बीजे श्रीमंत बापूसाहेबांनी रोवली होती, असे श्रीमंत खेमसावंत भोसले म्हणाले.

सावंतवाडी संस्थानचे भूपती म्हणून श्रीमंत बापूसाहेब महाराजांनी लोकप्रिय निर्णय घेऊन प्रजाप्रिय राजाचा नावलौकिक प्राप्त केला. त्यांच्या जीवन प्रवासात अल्पकाळातच राज्याची लोकप्रियता त्यांनी खऱ्या अर्थाने वाढविली. त्यामुळेच ते जनताप्रिय ठरले. श्रीमंत शिवराजराजेंनीदेखील तीच लोकप्रियता कायम राखली असे श्रीमंत खेमसावंत भोसले म्हणाले.

सावंतवाडीच्या राजघराण्याने संस्थानकाळात नगर परिषद निर्माण करूनही तैलचित्र नगर परिषदेत नसल्याची खंत होती; त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा श्रीमंत बापूसाहेब व श्रीमंत शिवरामराजेच्या तैलचित्र लावून कायमच स्मरणात राहावा म्हणून प्रयत्न करत आहोत, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले. या दोन फोटोतून ऐतिहासिक स्मरण जनतेला कायम वाटत राहील. श्रीमंत शिवरामराजे पाच वेळा आमदार बनले, पण मंत्रिपदासाठी कोणालाही त्यांनी विनवणी केली नाही ते राजासारखेच ताठ मानेने जगले, असे साळगावकर म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनीदेखील विचार मांडले.

डॉ. मधुकर घारपुरे, सतीश पाटणकर, कवी दादा मडकईकर, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, प्रकाश परब, बाबू कुडतरकर, राकेश नेवगी, नगरसेवक विलास जाधव, शर्वरी धारगळकर, शुभांगी, कीर्ती बोंडे, अफरोज राजगुरू, योगिता मिशाळ, संजय पेडणेकर, शब्बीर मणियार, तसेच नगरसेवक कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.