टिकाऊ वस्तू, सेंद्रिय भाजीपाल्यांचा प्रयोग

सावंतवाडी जिल्हा कारागृहात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आणि सेंद्रिय पद्धतीने कैद्याच्या मदतीने भाजीपाला बनवून नवीन पायंडा पाडण्यात आला आहे. तसेच सेंद्रिय भाजीपाला बनवितानाच त्यासाठी लागणारे पाणी प्लॅस्टिक बॉटलचा वापर करून सिंचन पद्धतीने दिले जात आहे. जेलमध्ये लागणारा भाजीपाला येथेच बनविला जात असल्याने आठवडय़ापोटी सुमारे सहाशे रुपयांची बचतदेखील होत आहे.
या कारागृहाचे अधीक्षक ए. एस. सदाफुले यांनी येथे आल्यापासून कैद्यांना सत्संग देण्यास सुरुवात केली. कारागृहात सकाळ-संध्याकाळ प्रार्थना होते. त्याशिवाय कैद्यांना विविध स्वरूपाचे मार्गदर्शनही तज्ज्ञ, जाणकारांना आणून केले जाते. या जेलमध्ये सुमारे ३५ कैदी आहेत.
कारागृह अधीक्षक ए. एस. सदाफुले आणि जेलर सी. एच. डी. पाटील या दोघांनी मिळून कैद्यांच्या जेलमध्ये उपक्रमही राबविले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक योग दिन जाहीर केला तेव्हापासून प्रशिक्षक विकास गोवेकर यांच्यामार्फत कारागृह कर्मचारी आणि कैद्यांना योगाचा लाभही सुरू केला.
नारळीच्या झापाच्या केरसुणी
या कारागृहाच्या आवारात सुमारे १९ नारळीची झाडे आहेत. या नारळीच्या झाडांना पाणी घालण्याची सोय केली आहे. विशेष म्हणजे बिस्लरी पाण्याची टाकाऊ बॉटल नारळीच्या झाडाभोवती उलटी जमिनीत रुतून ठेवून बॉटलचा तळ छाटला व खालच्या दिशेला लहान लहान छिद्रे काढून ठिंबक सिंचनसारखा प्रयोग केला. टाकाऊ बॉटल जमा करून हा प्रयोग केल्याने त्याला खर्च नाही. जमिनीत रुतून ठेवलेल्या या बॉटलमध्ये अधूनमधून पाणी भरल्यावर ठिंबक सिंचनप्रमाणे पाणी मुळाला मिळते, असे सदाफुले व पाटील यांनी सांगितले.
या नारळीच्या झाडांची झावळे खाली पडतात त्या झापांचा उपयोगही कैद्याच्या मदतीने करून घेतानाच दोन कातकरी समाजाच्या कैद्यांना प्रशिक्षणही दिले. दाजी महादेव मातोंडकर या कैद्याने नारळीच्या झावळ्यापासून केरसुणी बनविण्याचे दोघा कातकरी आदिवासी बांधवांना प्रशिक्षण दिले. या तिघांनी मिळून सुमारे ३५ केरसुणी बनविल्या.
या केरसुणी मुख्य कारागृहामार्फत वाटपदेखील करण्यासाठी प्रयत्न झाले. कैद्यांनी केरसुणी बनविल्या असतानाच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे कातकरी आदिवासी दोघा बांधवांना प्रशिक्षण मिळाल्याने जीवनात त्यांना निश्चितच त्याचा लाभ मिळेल. आज सुमारे शंभरच्यापेक्षा जास्त किंमत एका केरसुणीची आहे, असे ए. एस. सदाफुले व एच. डी. पाटील म्हणाले.
सेंद्रिय भाजीपाला
आज सेंद्रिय भाजीपाला मिळणे दुर्मीळ बनले आहे. रासायनिक खतांचा वापर सर्रास केला जातो, पण सावंतवाडीच्या कारागृहात अधीक्षक सदाफुले व जेलर पाटील यांनी पोलीस कॉन्स्टेबल भगवान गवळी याच्या सहकार्य आणि कैद्यांच्या अंगमेहनतीतून सेंद्रिय भाजीपाला बनविला आहे. जेलच्या आवारातील १५ ते २० गुंठे खुल्या जमिनीत हा भाजीपाला आहे.
जेलच्या आवारातील कचरा, गवत व वाया गेलेले अन्न एका खड्डय़ात टाकून सेंद्रिय खत बनविले जाते. याशिवाय दुधी भोपळा, भेंडी, मुळा, लालमाठ, चवळी, काकडी अशा विविध स्वरूपाच्या भाजीपाल्याची शेती या ठिकाणी केली जाते, त्यातही नियोजन असून वर्षभर कैद्यांना खाण्यासाठी हा भाजीपाला मिळायला हवा म्हणून आलटूनपालटून भाजी बनविली जाते.
या हंगामात दुधी भोपळा बनविला. जेलमध्ये पुरून उरलेला ४० किलो दुधी भोपळा सावंतवाडी येथील महिला अंकुर निवारा केंद्राला दिला. अणाव येथील जीवन आनंद आश्रमालाही दुधी भोपळा देण्याची तयारी अधीक्षक सदाफुले व पाटील यांनी दर्शविली आहे.
त्याशिवाय चवळीचा पालाही दिला जातो. आता मुळा व लालमाठ लवकर मिळणार आहे. कारागृहाची भूक भागवून अन्य संस्थांनाही उरलेला भाजीपाला देण्याची तयारी दर्शविली. हा मोफत दिला गेलेला भाजीपाला बाजारात विकताही आला असता पण कारागृह अधीक्षकांनी मोफतच अंकुर निवारा केंद्राला भाजी दिली. सावंतवाडी कारागृहात टाकाऊपासून टिकाऊ केरसुणी, सेंद्रिय भाजीपाला, मोफत ठिंबक सिंचन प्रयोग, योगा अध्यात्म आणि सकाळ-संध्याकाळी प्रार्थना अशा प्रयोगशीलतेला चालना देण्यात येत आहे.