08 December 2019

News Flash

सावंतवाडीतील विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी व दोडामार्ग तालुका इन्स्पायर अ‍ॅवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिलाग्रीस हायस्कूलच्या व्हर्टिकल मल्टिलेबल फार्मिग व प्राथमिक शाळा

| August 9, 2013 02:26 am

सावंतवाडी व दोडामार्ग तालुका इन्स्पायर अ‍ॅवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिलाग्रीस हायस्कूलच्या व्हर्टिकल मल्टिलेबल फार्मिग व प्राथमिक शाळा चौकुळच्या औषध फवारणी यंत्र प्रकल्पांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. प्राथमिक शाळांतून सहा व माध्यमिक शाळांतून चारप्रमाणे दहा प्रोजेक्टना १३० प्रकल्पांतून निवडण्यात आले आहे.
संध्याकाळी राज्य विज्ञान संस्था नागपूरद्वारा शिक्षण विभाग, पंचायत समिती सावंतवाडी व दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर अ‍ॅवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन मिलाग्रीस हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. तीनदिवसीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात प्रकल्पांची भेट घेऊन पाहणी केली.
या प्रदर्शनात मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी के. विजय गौतम याने व्हर्टिकल मल्टिलेबल फार्मिग प्रकल्प सादर केला. त्याला प्रथम क्रमांक देण्यात आला. द्वितीय आरपीडी हायस्कूलचा विद्यार्थी राजेश अनंत सावंत याच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग अ‍ॅण्ड इलेक्ट्रिसिटी प्रॉडक्शनला, तृतीय क्रमांक कारिवडे येथील पू. अप्पासाहेब पटवर्धन विद्यालयाची विद्यार्थिनी संतोषी भालचंद्र गावडे यांच्या सांडपाणीचा पुनर्वापर प्रकल्पाला तर चौथा क्रमांक कुडासे येथील सराची विद्यामंदिरची वृषाली विजय देसाईच्या जलव्यवस्थापन प्रकल्पाला देण्यात आला.
प्राथमिक शाळा स्तरावर चौकुळ प्राथमिक शाळा नं. ५ नेनेमधील कृष्णा सदाशिव गावडे यांच्या औषध फवारणीला प्रथम, इन्सुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.२ ची धनश्री हवालदार यांच्या पूरस्थितीवर नियंत्रण प्रकल्पाला द्वितीय तर तृतीय सेंट्रल इंग्लिश स्कूलचा अभिषेक नारायण सबनीसच्या पाणी स्टोअर्स प्रकल्पाला, चौथा क्रमांक मळेवाड केंद्रशाळा नं.१ची दिव्या विजय चरूठकर या विद्यार्थिनीच्या सडक्या केळीपासून इथेमॉलनिर्मिती प्रकल्पाला, कारिवडे शाळा क्र.१चा कृणाल कृष्णा परबच्या सुलभ उद्वाहक आणि सहावा क्रमांक सांगेली माध्यमिक विद्यालयाच्या अभिषेक अशोक शिर्के यांच्या बहुपयोगी सायकल प्रकल्पाला देण्यात आला.
या प्रदर्शनाचे बक्षीस वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष निकिता परब यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसभापती विनायक दळवी, मिलाग्रीसचे आंद्रू डी’मेलो, प्राचार्य फॅलिक्स लोबो, राज्य विज्ञान संस्थेच्या संपर्कप्रमुख अर्चना श्रीवास्तव, गटशिक्षणाधिकारी जगताप, देशपांडे, तेली, म. ल. देसाई आदी उपस्थितीत होते.
या वेळी राज्य विज्ञान संस्था नागपूरच्या अर्चना श्रीवास्तव यांनी काही प्रोजेक्ट बनविताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले नाही, असे आपल्या लक्षात आले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणांना चालना द्यावी तसेच इकोफ्रेंडली मटेरिअल प्रकल्पांना आवश्यक असून राष्ट्रीय पातळीवर प्रकल्प जाऊन विद्यार्थी वैज्ञानिक बनावेत, असे श्रीवास्तव म्हणाल्या.
जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब नियोजित कार्यक्रमास दीड तास उशिरा आल्या. त्या म्हणाल्या, विज्ञान युग असल्याने विद्यार्थ्यांना विज्ञान युगाशिवाय दुसरा पर्याय नाही. वैज्ञानिक बनण्यासाठी पालक व शिक्षकांनी जागरूक होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करून जिल्ह्य़ातील विद्यार्थी वैज्ञानिक व्हावेत अशी इच्छा प्रकट  केली.
या वेळी प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी जगताप यांनी केले. स्वागत फादर फॅलिक्स लोबो तर सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले.

First Published on August 9, 2013 2:26 am

Web Title: sawantwadi science exhibition gets enthusiastic response
टॅग Science Exhibition
Just Now!
X