सुटकेनंतर शिवसेना नेते सुरेश जैन यांची प्रतिक्रिया

राजकारणात सक्रिय व्हायचे की नाही ते निश्चित करण्यासाठी अजून बराच वेळ आहे. ती वेळ आल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल. समाजकारण हा आपला पिंड असून समाजासाठी यापुढेही काम करत राहणार असल्याचे सूचक विधान माजीमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी केले. कारागृहाबाहेर आल्यावर स्वातंत्र्याचे मोल समजते असेही ते म्हणाले.

घरकुल घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर साडे चार वर्षांनंतर जैन हे घरी आले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी तुरुंगातील जीवन आणि बाहेरील जीवन हा फार वेगळा अनुभव असून कारागृहाबाहेर आल्यानंतर स्वातंत्र्य काय असते ते समजते असे नमूद केले. धुळे कारागृहातून सुटका झाल्यानंतर ठिकठिकाणी जैन यांचे जोरदार स्वागत झाले. हा धागा पकडत त्यांनी जनतेचे जे प्रेम होते ते आजही कायम असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे सांगितले. जळगावच्या मातीत आपण वाढलो, त्यामुळे या मातीत आल्यावर आनंद झाला आहे. घरकुल घोटाळ्याचा खटला न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे सध्या बोलण्यासारखे काही नाही. राजकारणात सक्रिय व्हायचे की नाही, याची स्पष्टता करण्याचे त्यांनी टाळले. राजकारणात यायचे की नाही, हे निश्चित करण्यासाठी अजून वेळ आहे. राजकीय वारसदार ठरवणार काय, यावर त्यांनी योग्य वेळ आल्यावर त्याबाबत विचार केला जाईल असे सांगितले.

धुळे, जळगावमध्ये स्वागत

जळगावच्या घरकुल घोटाळा प्रकरणात साडे चार वर्षांपासून कारागृहात असलेले सुरेश जैन यांची शनिवारी दुपारी एक वाजता धुळे कारागृहातून सुटका झाली. कारागृहाबाहेर आणि जळगावमध्ये येत असताना ठिकठिकाणी समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.