जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी भाजपचे आमदार चंदुलाल पटेल यांच्या अविरोध निवडीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या कथित घोडेबाजाराची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या प्रकरणी निवडणुकीतील उमेदवार अ‍ॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार केली होती. त्याच्या चौकशीला अकरा महिन्यांनंतर मुहूर्त लागला आहे. या प्रकरणात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनाही चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठेची केलेली विधान परिषदेची ही निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली. त्यात एकूण २९ पैकी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार गुलाबराव देवकरांसह तब्बल २१ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली होती. माघारीसाठी गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, आजी-माजी आमदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर उपस्थित होते. यास आक्षेप घेत प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. विजय पाटील यांनी १३ नोव्हेंबर २०१६ रोजी तक्रार केली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारांसोबत केवळ चार व्यक्तींनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जात होता. तसेच ५ नोव्हेंबर २०१६ या माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीतून उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात खुलेआम माघारीसाठी आर्थिक घोडेबाजार दिसून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सौदेबाजीसाठी प्रशासकीय इमारतीच्या परिसराचा वापर करण्यात आला. महसूल अधिकारी व पोलिसांसमोर हा घोडेबाजार उघडपणे चालू होता. या दुर्दैवी घटनेची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वत: दखल घेऊन कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु तसे झालेले दिसून येत नाही. तसेच निवडणुकीसाठी नियुक्त केलेले भरारी पथकही बघ्याच्या भूमिकेत दिसून आले. ५ नोव्हेंबर रोजीच्या सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेले सीसीटीव्ही चित्रण आपण पाहावे, तद्नंतर भाजपवगळता इतर सर्व उमेदवारांना आपण त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात मांडलेल्या घोडेबाजाराबाबत विचारणा करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी तक्रार अर्जात केली.

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
East Nagpur, Congress, booth planning,
पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….
Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश
Neutral role of Teli community in Lok Sabha elections Community members will take collective decisions
लोकसभा निवडणुकीत तेली समाजाची तटस्थ भूमिका; समाजबांधव एकत्रित निर्णय घेणार

तब्बल अकरा महिन्यांनी या अर्जाची उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्यामार्फत चौकशी सुरू झाली असून तक्रारदार व अन्य साक्षीदारांचे जाबजबाब घेण्यात आले आहेत. उपलब्ध चित्रफितीच्या आधारे जाबजबाब सुरू आहेत. त्यात गिरीश महाजन व गुलाबराव पाटील हेदेखील दिसत असल्याने त्यांनाही पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.