02 July 2020

News Flash

रायगडमधील सहकारी बँकांना घोटाळ्यांचे ग्रहण!

संचालकांच्या अनियमिततेमुळे कर्नाळा बँक अडचणीत

(संग्रहित छायाचित्र)

संचालकांच्या अनियमिततेमुळे कर्नाळा बँक अडचणीत

हर्षद कशाळकर, संतोष सावंत, लोकसत्ता

अलिबाग/ पनवेल : कर्नाळा बँकेतील घोटाळ्यात सहकार विभागाच्या तक्रारीनंतर १४ संचालकांसह ७६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचालकांच्या मनमानी कारभारामुळे अडचणीत येणारी रायगड जिल्ह्य़ातील ही चौथी सहकारी बँक ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सहकाराला घोटाळ्यांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. या बँक घोटाळ्याचे सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या रायगड, रत्नागिरीसह पुण्यात एकूण १७ शाखा कार्यरत आहेत. ज्यात जवळपास १० हजार सभासदांसह एकूण ४० हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी आहेत. मात्र, ५१२ कोटी ५४ लाख रुपयांच्या अपहारामुळे ही बँक सध्या अडचणीत आली आहे. बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह एकूण ७६ जणांवर अपहाराचा ठपका ठेवून पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ६२ कर्जदारांचाही समावेश आहे. कोणत्याही हमीशिवाय या सर्वाना करोडो रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे नंतर यातील बरीचशी रक्कम विवेक पाटील यांच्याशी निगडित संस्थाकडे वळविण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे.

रायगड जिल्ह्य़ात सहकारी बँक अडचणीत येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी गोरेगाव अर्बन बँक, रोहा अष्टमी बँक, पेण अर्बन बँक या सहकारी बँका आर्थिक गैरव्यवहारांमुळे बंद पडल्या आहेत. यात आता कर्नाळा नागरी सहकारी बँकेची भर पडली. चारही बँकांच्या घोटाळ्यांना संचालकांचा मनमानी कारभार कारणीभूत ठरला आहे. यामुळे जिल्ह्य़ातील सहकार चळवळीला संचालकांच्या मनमर्जी कारभाराचे ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हजारो ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकून पडल्या आहेत. बँकेतील ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार प्रयत्नशील आहेत.

२०१७ पर्यंत कर्नाळा बँकेला लेखापरीक्षणात सातत्याने ‘अ’ वर्ग प्राप्त होत होता. २०१६ मध्ये या बँकेला ‘बँको आणि बँकिंग फ्रंटईअर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग प्राप्त करणारी ही बँक अचानक अडचणीत आली आहे. करोडो रुपयांच्या ठेवी अडकून पडल्याने ठेवीदार हतबल झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे चार महिन्यांपूर्वी विशेष लेखापरीक्षकांनी जो अहवाल दिला त्यात २००८ पासूनच बँकेत बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज वितरणाला सुरुवात झाली असल्याचे नमूद करण्यात आले. कर्ज वितरणात फेरफार करणे, बोगस कर्ज वितरित करणे, कागदपत्र नष्ट करण्यासारखे प्रकार सुरू असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी बँकेच्या झालेल्या लेखापरीक्षण अहवालाबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

शेकापच्या अडचणीत वाढ

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे माजी आमदार विवेक पाटील आणि शेकापच्या अडचणी वाढणार आहेत. विवेक पाटील हे बँकेचे अध्यक्ष असून या बँकेतील अनियमिततेत ते आणि संचालक मंडळ कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे बहुतांश ठेवीदार आणि कर्जदार हे शेकापशी संबंधित आहेत. याचा फटका शेकापच्या राजकारणाला बसण्याची शक्यता आहे. याच संधीचा फायदा भाजपने उचलला असल्याचे सध्या दिसून येत आहे. भाजप आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि माजी खासदार किरीट सोमय्या कर्नाळा बँकेविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत.

जिल्ह्य़ात अडचणीत आलेली ही चौथी सहकारी बँक आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे लोकांचा सहकारी बँकांवरील विश्वास उडत चालला आहे. ठेवीदारांच्या पैशांचा योग्य विनियोग करणे ही संचालक मंडळाची जबाबदारी असते. दुर्दैवाने ते ती नीटपणे सांभाळत नाहीत आणि सहकारी बँका अडचणीत येतात. त्यामुळे सहकारी बँका ‘आरबीआय’च्या नियंत्रणाखाली आणायला हव्यात. कर्नाळा बँकेतील संचालकांच्या आणि कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे दिले जावेत, अशी आमची मागणी आहे.

 – प्रशांत ठाकूर, भाजप आमदार.

जे पेण अर्बन बँकेत झाले, तेच आता कर्नाळा बँकेबाबत झाले आहे. सहकारी बँकांकडून वितरित केल्या जाणाऱ्या कर्जाची वसुली वेळेवर होत नाही. त्यामुळे बँका अडचणीत येतात. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. अनेक प्रयत्न करून आजही पेण अर्बन बँकेच्या थकीत कर्जाची वसुली झालेली नाही.

– नरेन जाधव, कार्याध्यक्ष ठेवीदार संघर्ष समिती, पेण अर्बन बँक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 2:14 am

Web Title: scams in co operative banks in raigad zws 70
Next Stories
1 ‘बविआ’च्या जव्हार तालुकाध्यक्षाला अटक
2 पालघरमधील शीतगृह निरुपयोगी
3 वाहतूक कोंडीवर केवळ चर्चाच!
Just Now!
X