News Flash

शिरोळ, हातकणंगलेत पाऊस अत्यल्प पण पंचगंगेमुळे पूरस्थिती

जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस झाला असला तरी अत्यल्प पाऊस झालेल्या शिरोळ व हातकणंगले तालुक्यात मात्र पुराचा धोका उद्भवला आहे. शुक्रवारी पावसाने उघडीप दिली असली

| July 26, 2014 03:00 am

जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस झाला असला तरी अत्यल्प पाऊस झालेल्या शिरोळ व हातकणंगले तालुक्यात मात्र पुराचा धोका उद्भवला आहे. शुक्रवारी पावसाने उघडीप दिली असली तरी धरणातील विसर्ग मोठय़ा प्रमाणात असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत चालली आहे.
गेल्या ८-१० दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिमेकडील भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. सातत्यपूर्ण पावसामुळे या भागात असणारी धरणे आता भरू लागली आहेत. लहान धरणे पूर्णत भरून गेली आहेत. त्यातून विसर्ग सुरू झाला आहे. तर राधानगरी (६०० क्युसेस), वारणा (९५० क्युसेस), घडप्रभा (९२४ क्युसेस) या मोठय़ा धरणातूनही विसर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. पावसाचे पाणी आणि धरणातील विसर्ग यामुळे जिल्ह्य़ातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्या पात्राबाहेरून वाहू लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्य़ाच्या पूर्वेकडील हातकणंगले व शिरोळ या तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरे तर शिरोळ व हातकणंगले या दोन तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. जिल्ह्य़ाच्या सरासरी पावसाच्या १/३ इतकाही पाऊस या भागात झालेला नाही. जिल्ह्य़ातील पावसाची सरासरी ७१६ मि.मी. इतकी आहे. शिरोळमध्ये हेच प्रमाण १६७ व हातकणंगले मध्ये २२२ मि. मी. इतके अल्प प्रमाण आहे. सर्वाधिक पाऊस झालेल्या गगनबावडा (२४०५ मि.मी) च्या तुलनेत या दोन तालुक्यांचे प्रमाण किरकोळ वाटावे असे आहे. गगनबावडय़ात दोन दिवसात जितका पाऊस या दोन तालुक्यात गेल्या दोन महिन्यात पडला आहे असेच आकडेवारीवरून सिद्ध होते. पण याच दोन तालुक्यात वारणा व पंचगंगा या दोन नद्या वाहतात व त्या पुढे कृष्णा नदीमध्ये मिसळतात. त्यामुळे तीन नद्या वाहणाऱ्या या भागात पाऊस कमी असला तरी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने या दोन तालुक्यातील शेतकरी पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.
दरम्यान जिल्हयातील ६९ बंधारे पाण्याखाली आहेत. एस.टी. चे आठ मार्ग पूर्णत तर दहा मार्ग अशंत बंद आहेत. १५ पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. मरळे व वाशी येथे मुक्कामास गेलेल्या गाडय़ा परत आल्या असल्या तरी गवसे येथील मुक्कामाची गाडी पुरामुळे परत आली नाही. गेल्या २४ तासात गगनबावडा येथे सर्वाधिक ७३ मि. मी. इतका पाऊस झाला आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:00 am

Web Title: scanty rainfall in shirol and hatkanangale flood stage to pancaganga
टॅग : Kolhapur
Next Stories
1 विधानसभेच्या तयारीची सोशल मीडियातून धूम!
2 स्वबळासाठी ‘अवसान’ शोधताना काँग्रेसचीच कसरत
3 ‘जालना जिल्ह्य़ात अकरा टक्के बालकांचा मृत्यू अतिसारामुळे’
Just Now!
X