पुणे : सध्या राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने प्रवेशांचा आढावा घेऊन त्यानुसार महाविद्यालयीन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांत विद्यापीठांकडून निवडणपुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून २० सप्टेंबपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

महाविद्यालयीन निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबतची बैठक बुधवारी मुंबईत झाली. त्या बैठकीत या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. जवळपास २५ वर्षांनंतर नव्या विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी शासनाने आचारसंहिता आणि नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसारच या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. महाविद्यालयांच्या निवडणुका आणि विद्यापीठाची निवडणूक अशा दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मतदार यादी जाहीर करण्यापासून विद्यापीठांची विद्यार्थी परिषद तयार करणे हे काम १३ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान होण्याची अपेक्षा आहे.

बैठकीत सर्व विद्यापीठांकडून महाविद्यालयीन निवडणुकांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाकडून त्यात काही त्रुटी दूर करण्यासाठीच्या सूचना करण्यात आल्या. सध्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू असल्याने विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रवेशांचा आढावा घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

प्रत्येक विद्यापीठाकडून निवडणुकीचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार असले, तरी काही दिवसांच्या फरकांनी एकाच सुमारास निवडणुका होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.

२५ वर्षांनंतर नव्या विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. मतदार यादी जाहीर करण्यापासून विद्यापीठांची विद्यार्थी परिषद तयार करणे हे काम १३ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान होण्याची अपेक्षा आहे.