शिष्यवृत्ती घोटाळ्याचे मुख्य केंद्र वर्धा असून, याच शहरातील एका भाजप आमदाराच्या शिक्षण संस्थांचाही समावेश आहे, तर कॉंग्रेसशी संबंधित चंद्रपूर जिल्ह्य़ातील एका विधानसभा उमेदवाराच्या संस्थांचीही लेखी तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा हा पैसा विधानसभा निवडणुकीत खर्च करण्यात आलेला आहे. दरम्यान, या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी शुक्रवारी प्राचार्य दिनेश बांगरे व नूर मोहम्मद खान या दोघांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांची संख्या आता १२ झाली आहे. 

गडचिरोली येथील शिष्यवृत्ती घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत असले तरी या गैरव्यवहाराचे मुख्य केंद्र वर्धा जिल्हा आहे. तेथील एक भाजप आमदार या घोटाळ्याचा म्होरक्या आहे. त्याच्या शिक्षण संस्थांचे जाळे संपूर्ण विदर्भात पसरले आहे. विशेष म्हणजे, हे आमदार महोदय पूर्वी राष्ट्रवादी व कॉंग्रेस या दोन्ही पक्षात सक्रिय होते. किंबहुना या आमदाराच्या संस्थेनेच सर्वाधिक शिष्यवृत्तींची उचल केली आहे, तसेच कॉंग्रेसशी संबंधित चंद्रपूर जिल्ह्य़ातील एका विधानसभा उमेदवारांच्या संस्थांचीही तक्रार गडचिरोली पोलिस दलाला प्राप्त झाली आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी या सर्वाची चौकशी होईल, अशी माहिती तपास अधिकारी पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा पैसा विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला, तर बहुतांश शिक्षण संस्थाचालकांनी महागडय़ा आलिशान गाडय़ा, शेती व भूखंड खरेदीसह रिअल इस्टेटमध्ये गुंतविला असल्याचेही तपासात समोर येत आहे. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असतांनाच आज वध्रेच्या खान कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे संचालक नूर मोहम्मद खान व समर्थ कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य दिनेश बांगरे यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. त्यांना शुक्रवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अटकेत असलेल्या शामल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक अमोल श्रीवास्तव उर्फ अमोल खापर्डे या एकाच व्यक्तीच्या राज्यभरात १३ विविध शिक्षण संस्था आहेत. त्याने हजारो बोगस विद्यार्थी दाखवून कोटय़वधीच्या शिष्यवृत्ती लाटल्याचे चौकशीत उघड झाले आहे. पोलिस या सर्व १३ संस्थांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, श्रीवास्तव हा आडनाव बदलवून ठिकठिकाणी असे प्रकार करीत होता. अमोलला न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असून त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. मूळचा वध्रेचा असलेल्या अमोल श्रीवास्तव हा खापर्डे यांच्याकडे दत्तक गेलेला असल्याने तो दोन्ही आडनाव लावतो. राज्यातील विविध जिल्ह्य़ात त्याच्या १३ वेगवेगळ्या नावांनी शिक्षण संस्था आहेत. या माध्यमातून त्याने हजारो बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखविले असून कोटय़वधीची शिष्यवृत्ती उचलली.