बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळ्यात गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेले गुरूसाई टेक्निकल एज्युकेशन, आष्टी व शिवाजी कॉलेज, वडसाचे संस्थाध्यक्ष भारत टोकलवार याला गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिष्यवृत्ती प्रकरणी अटक झालेला हा २४ वा आरोपी असून पोलिस वैशाली टेंभूर्णे, भाग्यलक्ष्मी टोकलवार यांच्यासह राजुरकर व शादाब हैदर या फरार संस्थाचालकांचा शोध घेत आहेत.
गडचिरोलीतील २५ कोटीच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात दिवसेंदिवस आरोपींची संख्या वाढत आहे. मूळचे चंद्रपूरचे असलेले व गडचिरोलीत गुरूसाई टेक्निकल एज्युकेशन, आष्टी व वडस्याच्या शिवाजी कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक साम्राज्य उभे करणारे टोकलवार यांनी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप करून शासनाची कोटय़वधी रुपयांनी फसवणूक केली. समाजकल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा टोकलवार यांनी गैरव्यवहार केल्याचे उघडकीस येताच पोलिस अटक करणार, या भीतीने ते चार महिन्यांपासून फरार होते. या कालावधीत ते जामीन मिळावा यासाठी प्रयत्नशील होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा व पत्नी भाग्यलक्ष्मी टोकलवार, वैशाली टेभूर्ण यांचाही जामीन रद्द केला. मात्र, यानंतरही ते बरेच दिवस फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील त्यांच्या मागावर होतेच. अशातच काल, गुरुवारी गडचिरोलीत टोकलवार आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या आधारावर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. या प्रकरणात अटक झालेले टोकलवार २४ वे आरोपी आहेत. दरम्यान, आज त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती आहे. टोकलवार यांच्या दोन्ही पत्नी भाग्यलक्ष्मी टोकलवार व वैशाली टेंभूर्ण फरार आहेत. टोकलवारांच्या अटकेनंतर आता या दोघींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करू, असे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. तिकडे एम्पायर संस्थेचे अध्यक्ष शादाब हैदर व राजुरकर हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून फरार असून त्यांचाही शोध घेत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
शिष्यवृत्ती प्रकरणात आतापर्यंत २४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहेत. यात शासकीय अधिकाऱ्यांपासून तर संस्थाचालक, प्राचार्य व अन्य लोकांचा समावेश आहे. तिकडे कारागृहातून सुटका होताच फरार झालेले एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके, लेखाधिकारी मनोजकुमार मून, प्रीतमसिंह बघेले व दिगंबर राठोड यांचाही शोध गडचिरोली पोलिस घेत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणातील या सर्व आरोपींची बॅंक खाती गोठविण्यात आली असतांना त्यांच्याकडे पैसा कुठून येत आहे व फरार होण्यासाठी कोण मदत करत आहे, याचाही पोलिस शोध घेत आहेत. टोकलवार यांच्या अटकेमुळे शिष्यवृत्ती प्रकरणातील बरेच घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, टोकलवार यांना अटक करताच त्यांच्या चंद्रपूर, नागभीड, सिंदेवाही, गडचिरोली, आष्टी व वडसा येथील संस्थांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.