गडचिरोली येथील कोटय़वधीच्या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी साडेतीन महिन्यापासून फरार असलेल्या साईराम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रोहीत चरणदास बोम्मावार, राकेश सोमेश्वर पोद्दूरवार, सचिव विजय वसंतराव कुरेवार व कोषाध्यक्ष सुरज रामदास बोम्मावार यांनी चामोर्शी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आत्मसमर्पण केले. दरम्यान, त्यांची चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात रवानगी केली असून स्थानिक गुन्हे शाखेने या चौघांना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी जिल्हा न्यायालयाकडे विनंती केली आहे.
गडचिरोलीतील बहुचर्चित २५ कोटीच्या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी समाजकल्याण व एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यापासून संस्थाचालक, प्राचार्य, सेतू कर्मचारी, अशा १७ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, घोटाळा उघडकीस आला तेव्हापासून या गैरव्यवहाराचे मुख्य सूत्रधार साईराम बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रोहीत बोम्मावार, सूरज बोम्मावार, राकेश पोद्दूरवार, विजय कुरेवार हे चौघे तब्बल साडेतीन महिन्यांपासून फरार होते. पोलिस या चौघांचा शोध घेत होती. मात्र, पोलिसांना चकवा देत या चौघांनी प्रथम चामोर्शी येथील न्यायालय, तेथून जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, दोन्ही न्यायालयांनी अर्ज फेटाळून लावल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ व सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न केले. सर्व ठिकाणी जामीन नाकारल्यानंतर शेवटी या चौघांनी चामोर्शी न्यायालयात स्वत: आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करताच चौघांची चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. मात्र, या चौघांची चौकशी व्हायची असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे हे चौघेही जिल्हा कारागृहात न राहता पोलिस कोठडीत जाण्याची शक्यता आहे, तर वर्धा येथील संस्था संचालक सचिन जसस्वाल यांचीही कारागृहात रवानगी केली आहे. या संपूर्ण शिष्यवृत्ती घोटाळ्यात बोम्मावार यांच्या शिक्षण संस्थेलाच सर्वाधिक शिष्यवृत्ती मिळालेली आहे. त्यामुळे या चौघांची कसून चौकशी झाली तर यात आणखी बरेच नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.