चंद्रपुरातील बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळा
बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी १४ महाविद्यालयांकडून २ कोटी, ४६ लाख रुपयांची शिष्यवृत्तीची अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, यातील केवळ दोन महाविद्यालयांनी अतिरिक्त रक्कम जमा केली असून, उर्वरित १२ महाविद्यालयांनी अद्याप रक्कम जमा केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणाचा २००९ ते २०१४ पर्यंतचा अहवाल चंद्रपूरचे सहायक समाजकल्याण आयुक्त कुळकर्णी यांनी समाज कल्याण आयुक्तांकडे सादर केलेला आहे. त्यानुसार या जिल्हय़ातील १४ महाविद्यालयांना अतिरिक्त शिष्यवृत्ती अनुदानाचे वितरण झाल्याची बाब निदर्शनास आली होती. यामध्ये भद्रावतीचे फेरीलॅन्ड कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीकडून २५ लाख, ५७ हजार १०० रु, आचार्य विनोबा भावे कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्सकडून ३० लाख, ३१ हजार ८२२, आचार्य विनोबा भावे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स, वरोरा, १५ लाख, चंद्रपूर कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर २१ लाख, कस्तुरबा कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स, बल्लारपूर, २८ लाख, इंदिरा कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, चंद्रपूर ३० लाख, स्व. राजे तेजसिंह भोसले कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, चंद्रपूर, २१ लाख, आचार्य विनोबा भावे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स, ब्रम्हपुरी, सेंट्रल कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, चंद्रपूर ५ लाख यासह अन्य महाविद्यालयांचा यात समावेश आहे. यातील भद्रावतीच्या फेरीलॅन्ड कॉलेजने २५ लाखांची अतिरिक्त उचलेली रक्कम जमा केली. उर्वरित एकाही महाविद्यालयाने ही अतिरिक्त रक्कम जमा केलेली नाही. या सर्वाकडून रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
या प्रकरणात संस्थाध्यक्षांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात सहायक आयुक्त बर्गे, एस.टी. वानखेडे यांच्यापासून तर कनिष्ठ लिपिक व्ही.एन.डोंगरे, छाया बागडे व वरिष्ठ लिपिक ए.एम.इंगोले यांनी शिष्यवृत्तीची रक्कम अदा केल्याने ते देखील दोषी असल्याचे म्हटले आहे. यातील बर्गे यांच्यावर याआधीच कारवाई झालेली आहे.

‘अंतिम अहवाल लवकरच’
या संदर्भात समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘आपण राज्याचे समाजकल्याण आयुक्तांना माहिती सादर केली होती. त्यांच्याकडून काही महाविद्यालयांना वितरित झालेली अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचे आदेशही आले होते. त्यातील फेरीलॅन्ड महाविद्यालयाकडून २५ लाख वसूल केले. उर्वरित महाविद्यालयांनी रक्कम अजून भरलेली नाही. या संदर्भातील अंतिम अहवाल लवकरच येणार असून त्यानंतर ज्या महाविद्यालयांनी रक्कम भरली नाही त्यांची संपत्ती गोठविण्याची कारवाई करू.