बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी ‘स्नेहग्राम’च्या शाळेचा अनोखा उपक्रम

सोलापूर : भूत-प्रेत, स्मशान याविषयी समाजात पिढय़ान् पिढय़ा भीतीचे वातावरण कायम राहिले आहे. बालवयापासूनच हे भीतीचे संस्कार घडविले जातात. जवळच्या नात्यातील एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीविषयी बालमनाला अनामिक भीती जाणवते. ही भीती मनातून कायमची नष्ट करण्यासाठी आणि बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी तालुक्यातील ‘स्नेहग्राम’ निवासी शाळेतील मुला-मुलींची चक्क स्मशानभूमीची सहल घडविण्यात आली. स्मशानात जेथे शोकाचे, दु:खाचे अश्रू पाहायला मिळतात, तेथे स्नेहग्रामच्या मुलांनी अगदी आनंदात नीडरतेचे धडे गिरविले. ही अनोखी सहल मुलांच्या मनातील भीतीचे समूळ उच्चाटन करणारी ठरली.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

समाजात सर्वाधिक वंचित राहिलेल्या भटक्या जमातीच्या निराश्रित, अनाथ व वंचित मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विनया आणि महेश निंबाळकर या दाम्पत्याकडून बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे स्नेहग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून निवासी शाळा चालविली जाते. स्थलांतरित, शहरात रस्त्यांवर भीक मागणारी शाळाबाह्य़ मुले, अनाथ, निराधार, वंचित व संघर्षग्रस्त मुले, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुले, लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुले, माळरानावर पाली टाकून राहणाऱ्या दुर्लक्षित भटक्या जाती-जमातींची मुले अशांना निंबाळकर दाम्पत्याने एकाच छताखाली आणून औपचारिक शिक्षणासह कौशल्याधारित शिक्षण आणि व्यावहारिक जीवनानुभव देण्याचे व्रत चालविले आहे. या स्नेहग्राम प्रकल्पाला उभारी देण्यासाठी २०१८ साली गणेशोत्सवात ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमांतर्गत आर्थिक साह्य़ही करण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या निवासी शाळेतील मुला-मुलींना औपचारिक व कौशल्याधारित शिक्षणासह जीवनानुभव देण्याचा एक भाग म्हणून थेट ‘भुतांच्या भेटीची सहल’ काढण्यात आली. याबाबतची माहिती महेश निंबाळकर यांनी समाज माध्यमाद्वारे देताना स्मशानभूमीच्या सहलीचा अनुभव कथन केला आहे. शाळेत वर्गावर शिकविताना निंबाळकर यांनी एके दिवशी मुलांना सहज विचारले, उद्या स्मशानात जायचे काय? मुलांनी उत्साहाने होकार दिला तर काही मुलांच्या चेहऱ्यांवर भीतीचे भाव दिसले. स्मशानात भुतांचे अस्तित्व असते,या समजाने अनेक मुलांच्या मनात पक्के घर केले होते. त्याकरिताच बालमनातील भुतां-प्रेताविषयीची भीती समूळ नष्ट करण्यासाठी हा अनोखा प्रयोग हाती घेण्यात आला.

ठरल्याप्रमाणे स्नेहग्राम प्रकल्पाची बस गावातील मोक्षधाम या  स्मशानभूमीत आली. सामाजिक कार्यकर्ते कमलेश मेहता यांनी या उपक्रमाला पाठिंबा देत त्यात स्वत: सहभाग घेतला होता. मुलांची बस स्मशानभूमीत पोहोचली तेव्हा मेहता हे त्यांच्या स्वागताला हजर झाले. स्मशानभेटीपूर्वी मुलांना अल्पोपहार दिला गेला आणि महादेवाच्या मूर्तीपासून स्मशानभेटीला प्रारंभ झाला. हत्तीवर विराजमान देवेंद्र पाहिले. तोच मुलांची नजर प्रेत जळत असलेल्या चितेकडे गेली. तेव्हा मुले घाबरतील असे वाटले. परंतु प्रत्येकाच्या डोळ्यांत भीतीचा लवलेश  नव्हता. प्रेत जळत असलेल्या चितेजवळ भुतांविषयीच्या गप्पाही झाल्या. मुलांच्या मनातील भूत-प्रेतांच्या कल्पनाही जाणल्या गेल्या. त्याचवेळी हाडे-फॉस्फरस, दात-सोडियम, मानवी कवटी याविषयीसुध्दा चर्चा झाली. स्मशानात काहीवेळेला आपोआप हाडे कशी पेट घेतात, यात भुतांचा प्रताप नसून फॉस्फरस धातूची करामत कशी असते, हेदेखील मुलांना पटवून देण्यात आले. शेवटी स्मशानभूमीतील नवे बांधकाम, विद्युतदाहिनी, प्रशस्त बैठकीची व्यवस्था, बाग-बगिचा यांची माहिती देण्यात आली. मुलांच्या प्रश्नांना उत्तरेही देण्यात आली.