करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक सत्राचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असला तरी विद्यार्थ्यांंचे अध्ययन सुरू होऊ शकलेले नाही. ऑनलाइन अध्ययनात अनेक अडथळे आहेत. या अडथळ्यांवर मात करून विद्यार्थ्यांंचे अध्ययन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केले आहेत. त्यासाठी  ‘शाळा बंद—शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंपर्यंत ‘स्वाध्यायपुस्तिका’ पोहोचवल्या जाणार आहेत. या उपक्रमास ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या वित्त आयोगाच्या निधीची जोड दिली गेली आहे. १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांंपर्यंत या स्वाध्यायपुस्तिका पोहोचवल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले व उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात माहिती देताना शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) रमाकांत काटमोरे यांनी सांगितले,की शिक्षक विद्यार्थ्यांंच्या अध्ययनासाठी प्रयत्नशील असले तरी ग्रामीण भागात अध्ययनात सुविधांच्या अडचणी आहेत.

उपक्रमशील शिक्षकांच्या मदतीने प्रथम सत्राच्या पाठय़क्रमावर आधारित १ ली ते चौथीसाठी इयत्तानिहाय ४ स्वाध्यायपुस्तिका विकसित करण्यात आल्या.या स्वाध्यायपुस्तिकांची छापील प्रत विद्यार्थ्यांंना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पहिलीची स्वाध्याय पुस्तिका ४४ पानांची, दुसरीची ४८, तिसरी व चौथीची प्रत्येकी ४९ पानांची आहे. ग्रामपंचायतीला १४ वा व १५ वा वित्त आयोगाचा निधी मिळतो. या निधीतून शिक्षणासाठी खर्च करण्याची तरतूद आहे. स्वाध्यायपुस्तिकांच्या छपाईसाठी प्रत्येकी ३ हजार रु. ग्रामपंचायतींनी द्यायचे आहेत, तशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.

यापेक्षा अधिक खर्चाची आवश्यकता भासल्यास स्थानिक पातळीवर लोकसहभागातून खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसात या स्वाध्यायपुस्तिका वितरित केल्या जातील.

विद्यार्थ्यांंच्या अध्ययनात खंड पडू नये, सर्व स्वाध्याय कृतिवहीत पूर्ण करणे, स्वाध्यायपुस्तिका सोडवण्यासाठी त्या विषयाचे पाठय़पुस्तक वापरता येणार आहे, त्यासाठी आई, वडील भाऊ, बहीण, मित्रांची मदत घेता येणार आहे, अधिक अडचणी आल्यास शिक्षकांशी संपर्क करता येणार आहे, सोडवलेल्या स्वाध्यायपुस्तिका शिक्षकांनी काही ठरावीक काळानंतर तपासायची आहे.

शिक्षण मंत्र्यांकडून प्रोत्साहन

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड नगर मार्गे पुण्याकडे रवाना झाल्या. त्या वेळी शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी त्यांची भेट घेऊन स्वाध्यायपुस्तिका दाखवली व उपक्रमाची माहिती दिली.