|| निखिल मेस्त्री

शालेय पोषण आहारासाठीचा २५०० गोणी तांदूळ वरईतील खासगी गिरणीत:- धान्य वितरण व्यवस्थेच्या पुरवठा विभाग निरीक्षकांनी वरई (सफाळे महामार्ग) येथील एका भात गिरणीच्या तपासणीदरम्यान सार्वजनिक धान्याचा मोठा साठा जप्त केला. गिरणीत सुमारे २५०० गोणी तांदूळ असल्याचे समजते. भारतीय अन्न महामंडळाच्या फिरोजपूर गोदामातील हा तांदूळ अन्न महामंडळाचा शिक्का असल्यावरून समजते. सातारा जिल्ह्यच्या कोटय़ातील तांदळाचा साठा महामार्गावरील वरई हद्दीत एका खासगी गिरणीत कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या वसई तालुक्यातील एका महिला बचत गटामार्फत हा तांदूळ सफाईची प्रक्रिया करण्यासाठी गिरणीत आला आहे. तो जिल्हा परिषदेच्या शालेयपोषण आहाराचा तांदूळ असल्याचे गिरणीतील एका कामगाराने सांगितले. याबाबत प्रत्यक्ष ठिकाणी तांदूळ शालेय पोषण आहार योजनेचा आहे का, ही तपासणी करणार असल्याचे वसई गटशिक्षणाधिकारी तांडेल यांनी म्हटले आहे.

शाळा दोन महिन्यांनी या तांदळाची मागणी करते. भारतीय अन्न महामंडळाच्या मुंबई येथे  असलेल्या  गोदाममधून शाळांमध्ये मागणीनुसार तो प्रत्यक्ष वितरित करण्यात येतो. त्यानंतर  या शाळा तांदळाचा साठा करून तो बचत गटांमार्फत शिजवून शाळांना पुरविण्यात येतो.

असे असले तरी इतका मोठा साठा जिल्हा परिषद शाळांनी या बचत गटाला सफाई प्रक्रिया करता दिला कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गिरणी कामगाराच्या  सांगण्यावरून  हा तांदूळ  शालेय पोषण आहार योजनेचा असेल  तर  प्रशासन  संबंधितांवर  काय कारवाई करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या  प्रकरणाची माहिती घेऊन संबंधित प्रकरण काय आहे ते सांगू, असे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी सांगितले.

हा तांदळाचा साठा रेशन धान्य वितरण प्रणालीचा नसून तो जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण अखत्यारीतील आहे. याबाबतचे जाबजबाब प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहोत. -संजय अहिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर.

गिरणीमध्ये तांदळाचा साठा असल्याची माहिती मिळाली आहे. तो शालेय पोषण योजनेचा आहे का यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणीकरिता आदेश दिलेले आहेत आणि तसा अहवालही सादर करण्यास सांगितले आहे. -नीलेश गंधे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती, जि. प पालघर.