News Flash

महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणार शाळा

नागरी भागात मात्र ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक परिसर क्षेत्रातील नववी ते १२ इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तर उर्वरित ग्रामीण भागातील शाळा मात्र १ डिसेंबरनंतर शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची अनुमती राज्य शासनाने दिली असून त्याबाबतचा जिल्हास्तरीय निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार, आमदार आणि वसई विरार महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, पालघर, डहाणू व जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा व विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र तसेच बोईसर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा सुरू करण्यात येऊ नये असे सूचित करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत संमती पत्र घेण्यात येणार आहे. त्या संमतीपत्रांनंतर स्थानिक परिस्थितीनुसार शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ई-लर्निंग सुविधा नसलेली ठिकाणे व मोबाईल नेटवर्कची अडचण असलेल्या ठिकाणी शाळा प्राधान्याने सुरू करण्यात याव्या असे या आदेशात म्हटले आहे. ज्या गावांमध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही, तेथे शाळा १ डिसेंबरनंतर सुरू करण्यात यावी असे सूचित करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरू होणार असतील, तेथील शिक्षकांनी जवळच्या आरोग्य उपकेंद्रात अथवा कोविड केअर सेंटर मध्ये आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी. तसेच आजाराची लक्षणे असलेल्या शिक्षकांनी प्रथम प्रतिजन चाचणी करून घेऊन ही चाचणी नकारात्मक आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालकांनी आजारी पाल्यांना शाळेत पाठवू नये. परिस्थितीनुसार शाळेच्या मोकळ्या पटांगणात वर्ग भरवण्याचा प्रयत्न करण्यात यावा, शासन निर्देशानुसार निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात यावी तसेच प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात येऊ नयेत, असे देखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे. ज्या ठिकाणी शाळा ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, त्या ठिकाणी शाळेतील शिक्षकांनी करोना चाचणी करू नये, असेही नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चाचणी करण्याबाबतचे नियोजन करावे असे या आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या गावाच्या शाळेवर शिक्षक नियुक्त केला असेल त्याच गावात शिक्षकाची राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किमान पाच ते १० शाळांकरिता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे असेही सूचित केले आहे. निवासी आश्रम शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तसेच समाज कल्याण विभागांतर्गत वसतीगृहे व इतर निवासी शाळा सुरु करण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे.

———-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 5:16 pm

Web Title: school reopening from 1 december in rural areas of palghar district but colleges in urban areas will remain close till 31 december vjb 91
Next Stories
1 “दहावी, बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलावा लागेल, लस येईपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई नको”
2 “ये तो बस झांकी है, आगे और लढाई बाकी है!..”; चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा
3 जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?; एनसीबी अधिकाऱ्यावरील हल्ल्यानंतर भाजपाचा सवाल
Just Now!
X